गडहिंग्लज बड्याची वाडी आणि गडहिंग्लज शहर येथील काळभैरव देवस्थानच्या स्थानिक व्यवस्थापनेसाठी स्थानिक सल्लागार उपसमितीची मुदत संपल्याने नव्याने शासकीय उपसमितीची नियुक्ती करण्यात आली आहे . पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने याबाबतचे आदेश काढले आहेत . उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या समितीत एकूण दहा शासकीय सदस्य असणार आहेत.
गडहिंग्लज शहर आणि बड्याचीवाडी येथे काळभैरवाचे मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी सुमारे तीन - चार लाख भाविकांच्या उपस्थितीत मोठी वार्षिक यात्रा होत असते. या देवस्थानच्या व्यवस्थापनाची स्थानिक उपसल्लागार समिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थापन व्यवस्थापन समितीने नेमली होती. या समितीची मुदत संपली आहे. त्यामुळे नव्याने समिती नियुक्त करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा प्रशासन देवस्थान समिती पश्चिम महाराष्ट्र यांच्या दालनात नुकतीच बैठक झाली. या बैठकीत उपसमिति नेमण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज यांना देण्यात आले होते. त्यानुसार उपविभागीय अधिकारी वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली काळभैरव देवस्थानकडे स्थानिक सल्लागार उपसमिति नेमण्यात आली. या समितीत उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले हे खजिनदार तर तहसीलदार दिनेश पारगे सचिव राहणार आहेत. सदस्य म्हणून गटविकास अधिकारी शरद मगर, पोलीस निरीक्षक दिवसे, मुख्याधिकारी स्वरूप खारगे,भूमि अभिलेखचे अधीक्षक समाधान घुले, तलाठी अजितसिंह किल्लेदार, ग्रामसेवक तिरस्कार यांचा समावेश करण्यात आला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, मानकरी, ग्रामस्थ यांना यात संधी देण्यात आली नसून पुढील आदेश होईपर्यंत ही समिती कार्यरत राहणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.