छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केली जाणारी वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न यासह विविध मुद्द्यांवरून काल महाविकास आघाडीच्यावतीने मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा मोर्चा ‘नॅनो मोर्चा’ असल्याची टीका केली होती. दरम्यान, फडणवीसांच्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अशा प्रकारच्या विधानाची अपेक्षा नाही. हेच वक्तव्य शिवसेनेतून फुटलेल्या ४० आमदार आणि त्यांच्या नेत्याने केलं असतं तर समजू शकलो असतो. कारण त्यांची बुद्धी नॅनो आहे, हे आम्हाला माहिती आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस हे प्रगल्भ राजकारणी आहेत. त्यांनी विरोधी पक्षातही प्रदीर्घ काम केलं आहे, अशा देवेंद्र फडणवीसांना कालचा मोर्चा दिसला नसेल, तर दिल्लीश्वरांनी त्यांना गुंगीचं औषध दिलेलं दिसते आहे, ही त्यांची गुंगी अद्यापही उतरलेली नाही”, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले.