वीर सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम फडणवीस – मोदी यांनी केले नाही, अशा शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाने वीर सावरकरांवरुन राज्यात सुरु असलेल्या वादासंदर्भात म्हटलं आहे. उद्धव ठाकरे संपादक असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटावरही शिवसेनेनं आगपाखड केली आहे. इतकेच नाही तर काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनाही ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये हा विषय उकरून काढण्याची काय गरज होती असा सवाल उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. इतिहासाशी वैर अलीकडे सगळ्यांनीच घेतलेले दिसते, असं म्हणत रागुल गांधींबद्दल सूचक विधान अग्रलेखात करण्यात आलं आहे.
भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मिंधे गटाचे वीर सावरकर प्रेम अचानक उफाळून आले, पण त्यांना ही अशी उफाळण्याची संधी राहुल गांधी यांनी दिली. हा सर्व प्रकार टाळता आला असता तर बरे झाले असते. ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात येताच राहुल गांधी यांचे भव्य स्वागत झाले. जनतेचा प्रतिसादही उदंड लाभला. हे सर्व उत्तम चालले असताना राहुल गांधी यांना सावरकरांच्या कथित माफीचा विषय काढून भाजपा व मिंधे गटाच्या हाती कोलीत देण्याची गरज नव्हती हे खरेच. त्यामुळे नकली हिंदुत्ववाद्यांना सावरकर प्रेमाचे आचकेउचके लागले,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
राहुल गांधी व त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी मिंधे गटाचे लोक काही ठिकाणी रस्त्यावर उतरले. मात्र पुण्यात या लोकांनी राहुल गांधींना सोडून सावरकरांनाच जोडे मारल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. सावरकरांचा अपमान राहुल गांधींनी केला व त्याचा निषेध केला पाहिजे, पण निषेध करण्यासाठी ज्यांना रस्त्यावर उतरवले त्यांना राहुल व सावरकर यांच्यातला फरक कळला नाही, असा एकंदरीत हिंदुत्वाचा गोंधळ सरकारात उडालेला दिसतोय,” असा खोचक टोला शिंदे गटाच्या पुण्यातील आंदोलनामध्ये घडलेल्या प्रकारावरुन ठाकरे गटाने लगावला आहे
वीर सावरकर हे अंदमानच्या काळ्या पाण्यातून इंग्रजांची माफी मागून सुटले की फ्रान्स येथे मारिया बोटीतून उडी मारून निसटले, हा काही राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा विषय नव्हता. देशातील नफरत, द्वेषाचे पसरत चाललेले जहर, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर लोकांना जागे करण्यासाठी राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली आहे. राहुल गांधी रोज साधारण १५ किलोमीटर चालतात व त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात जनता चालत असते. राहुल गांधी यांची जी प्रतिमा गेल्या काही वर्षांत भाजपाने तयार केली त्याला छेद देणारी त्यांची ही ‘भारत जोडो’ यात्रा आहे. भारतीय जनता पक्ष कितीही ‘नाही नाही’ म्हणत असला तरी ‘भारत जोडो’ यात्रेची दखल त्यांना घ्यावी लागत आहे. राहुल गांधी यांचे श्रम, कष्ट त्यामागे आहेत; पण अचानक वीर सावरकरांच्या नावाने त्यांचे मन अस्थिर होते व सर्व केलेल्यावर पाणी पडते. असे का व्हावे?” असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात येऊन सावरकरांच्या कथित माफी प्रकरणाचा कोळसा उगाळल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांची अवस्थाही अवघडल्यासारखी झाली असेल. राहुल गांधी यांनी हिंगोलीत विधान केले की, ‘‘सावरकर हे इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसविरोधात सावरकर इंग्रजांसोबत काम करायचे.’’ त्याशिवाय, ‘मला मुक्त करा, मी बाहेर येताच आपल्या आज्ञाधारक सेवकाप्रमाणे काम करीन,’ असेही सावरकर यांच्या याचिकेत म्हटल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले व त्याबाबतची कागदपत्रे पत्रकारांसमोर फडकवली. या सगळ्याची गरज नव्हती, पण हे राहुल गांधी यांना सांगायचे कोणी?” असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे.