पुण्यातील नवले पूलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर झालेल्या अपघातात टँकर चालकाने ४८ वाहनांना धडक दिली. यानंतर या गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातात जखमी झालेल्यांपैकी सात ते आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टँकरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचं बोललं जात होतं. मात्र तपासादरम्यान यामागे दुसरं कारण असल्याचं स्पष्ट झालं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना झाली नसल्याचं समोर आलं आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर ही माहिती समोर आली आहे. चालकाने उतार असल्याने इंजिन बंद केलं होतं आणि गेअर न्यूट्रल करत ट्रक चालवत होता. पण वेळेवर ब्रेक दाबू न शकल्याने त्याने ४८ गाड्यांना धडक दिली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दुर्घटनेनंतर घटनास्थळावरुन फरार झालेल्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. मणिराम छोटेलाल यादव असं या चालकाचं नाव असून, तो मध्य प्रदेशचा आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर रविवारी रात्री टँकरच्या धडकेने ४८ वाहनांचं नुकसान झालं. जखमींची संख्या सुमारे ३५ ते ४० होती. किरकोळजखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या सात ते आठ जखमींवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.