स्वातंत्रवीर सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितल्याच्या मुद्द्यावर बोलताना एका वृत्तावाहिनीच्या कार्यक्रमात भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली, असं वादग्रस्त विधान केलं होते. यासंदर्भातला व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केला होता. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सावरकरांच्या पत्राची तुलना शिवाजी महाराजांच्या पत्राशी करणं हा केवळ मुर्खपणा आहे, असे ते म्हणाले. तसेच भाजपाने यावर भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा सुधांशू त्रिवेदी ज्या दिवशी महाराष्ट्रात येईल, चप्पलेने त्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशाराही त्यांनी भाजपाला दिला.
भाजपाचे वादग्रस्त प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी अक्कलेचे तारे तोडताना सावरकरांच्या माफीनाम्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याशी केली आहे. इतिहासानुसार मिर्जाराजे जयसिंगांबरोबर तहाची बोलणी असेल किंवा अफजल खानाशी झालेला पत्रव्यवहार असेल, हा गनिमी काव्याचा भाग होता. महाराज जसे दोन पालवं मागे आले, त्यानंतर त्यांनी शत्रूंवर तितक्याच ताकदीने हल्लाही केला. मात्र, सावरकर बाहेर आल्यानंतर त्यांनी इंग्रजांविरोधात कोणतेही बंड केलं नाही, असा इतिहास सांगतो. त्यामुळे सावरकरांच्या पत्राची तुलना शिवाजी महाराजांच्या पत्रांशी करणं हा केवळ मुर्खपणा आहे”, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली.
भाजपाने विषयावर तोंड उघडावं, याबद्दल त्यांची काय भूमिका आहे, ते भाजपाने स्पष्ट सांगावे. राज्यापालांनी जे बेताल वक्तव्य केलं आहे, त्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात रोष आहे. याबद्दलही भाजपाने भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा अशा बेताल वक्तव्य करणारे सुधांशू त्रिवेदी ज्या दिवशी महाराष्ट्रात येईल. चप्पलेने त्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही”, असा इशाराही त्यांनी भाजपाला दिला.