गडहिंग्लज : अलीकडील काही वर्षापासून महसूल खात्यातर्फे गावातील रेशन दुकानातून स्वस्त धान्य वाटप करताना बायोमेट्रिक पद्धत राबवली आहे. परंतु या ऑनलाइन प्रक्रियेतील अडसरामुळे रेशन कार्ड धारकांची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे यावर उपाययोजना करण्याची मागणी शिवसह्याद्री प्रतिष्ठानने केली आहे.
यासंदर्भात महसूल नायब तहसीलदार राजेंद्र यादव यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, बायोमेट्रिक पद्धतीने गावागावातील लाभार्थींना स्वस्त धान्याचे वाटप होते. या पद्धतीमुळे अनेक अडचणी येत आहेत. मशीनचा सर्वर वारंवार बंद पडतो, काही वेळा डाऊन झालेला असतो, अनेक वेळा लाभार्थींचे थंब मशीन घेत नाही. त्यामुळे लाभार्थीना तासन्तास रांगेत उभारावे लागते. उन्हात रांगा लागलेल्या असतात. वृद्ध दिव्यांगणा शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते.
बायोमेट्रिक पद्धतीतील अडचणी अनेक वर्षांपासून सुरू आहेत. परंतु त्यावरील उपाययोजनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे तातडीने या समस्यांवर उपाय शोधावेत, अन्यथा आंदोलन छेडले जाईल. शिवसह्याद्रीचे जिल्हाध्यक्ष विनायक इंदुलकर, संपर्कप्रमुख निखिल डवरी, शाखाध्यक्ष सुभाष खानापुरे, अवधूत डवरी, साहिल सोलापुरे, तालुकाध्यक्ष शाहिद खनदाळे, शहर प्रमुख संघराज विटेकरी आदींच्या शिष्टमंडळांनी हे निवेदन सादर केले.