चंदगड, ता. १३ : तालुक्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांचे दयनीय अवस्था झाली आहे. खड्ड्यामुळे रस्त्यांवर गाडी हाकताना चालक आणि प्रवासी यांच्या शारीरिक त्रास होत आहे. रस्त्याची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी केला आहे.
याबाबत जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पाटील व तालुकाअध्यक्ष राज सुभेदार यांच्या नेतृत्वाने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले. बेळगाव वेंगुर्ला मार्ग, अडकून - कोदाळी पाटणे फाटा पारगड, हलकर्णी ते हेरे, ढोरगरवाडी- कोवाड तुर्केवाडी ते तिलारी या सर्वच रस्त्याचे अवस्था बिकट झाली आहे. गावांना जोडणारे ग्रामीण मार्ग, जिल्हा मार्ग आणि राज्य मार्गसुद्धा खड्ड्यांनी व्यापल्यामुळे प्रवास करायला नको, अशी अवस्था झाली आहे. नोकरी व्यवसाय निमित्त प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मणक्याचे विकार सुरू झाले आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष आहे परंतु बांधकाम विभागाकडून काही प्रयत्न होताना दिसत नाहीत. तालुक्यात भाजीपाला व इतर शेतमाल मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. तो बेळगाव येथे बाजारपेठात विक्रीसाठी नेला जातो. परंतु, रस्त्याच्या दूरवस्थेमुळे माल नेण्यातही अडचणी येत आहेत. या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन बांधकाम विभागाने रस्त्याचे डागडुजी करावी, अशी मागणी केली.