आजरा : मडिलगे गावाचे ग्रामदैवत भावेश्वरी देवीची यात्रा २०२३ मध्ये होते आहे. तब्बल १२ वर्षानंतर ही यात्रा होत असून दि. २४, २५, व २६ एप्रिल रोजी यात्रेचे आयोजन करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला.देवस्थान कमिटीचे अध्यक्ष तथा सरपंच गणपतराव आरळगुंडीकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यात्रेचे नेटके आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक देवस्थान कमिटी व यात्रा कमिटी अशी संयुक्त कमिटी तयार केली आहे. या कमिटीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच के. व्ही. येसणे यांची, तर सचिव म्हणून सदानंद पाटील यांची निवड करण्यात आली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिराची रंगरंगोटी, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, वीजपुरवठा आदी तयारी ग्रामपंचायतीला वेळेत करावी लागणार आहे. तसेच यात्रेसाठी साऱ्यांना मेहनत घ्यावी लागणार असल्याचे सांगण्यात आले. मडिलगे परंपरेला शोभेल अशाप्रकारे यात्रा करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष येसणे यांनी केले.