मंत्रालयात होणार आज हेरे सरंजाम प्रश्र्नी बैठक

KolhapurLive
     

      चंदगड तालुक्यातील वर्षांनुवर्ष रखडलेला हेरे सरंजाम प्रश्न मार्गी लावण्याबाबत बुधवार दि.१६ नोव्हेंबर रोजी दुपारी१२.३० वाजता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता माथाडी जनरल संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी दिली. त्यामुळे या बैठकीमध्ये या प्रश्नाबाबत कोणता निर्णय होणार याकडे संबंधितांचे लक्ष लागून राहिले आहे.
      चंदगड तालुक्यातील गावातील हेरे सरंजामच्या वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करण्यासाठी शासनाच्या उदासीन धोरणामुळे लालफितीच्या कारभारात अडकला आहे. त्यामुळे गेल्या वीस वर्षापासून चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना खरेदी विक्री, बँक कर्ज ,सेवा सोसायटी कर्ज काढण्यासाठी वर्ग २ असे नमूद असल्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारे अर्ज काढता येत नाही. त्यामुळे अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांची मोठी गैरसोय निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. हेरे सरंजाम प्रश्न बाबत प्रशासनाकडे वारंवार खेटे मारूनही त्याकडे ते गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रगतीला खेळ बसली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या विषयाची गंभीरता पटवून देऊन हा विषय कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आपण पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून बुधवार दि.१६ नोव्हेंबर रोजी महसूलमंत्र्यांच्या दालनात या प्रश्नावर विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत हेरे सरंजाम चा प्रश्न कायमचा मार्गी लागेल असा विश्वास आपल्याला असल्याचे राज्य माथाडी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आज मंत्रालयात होणारे या बैठकीकडे ४७ गावातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.