मुंबई | 18 मार्च 2023 : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. उमेदवारांची यादी फायनल केली जात आहे. नाराज उमेदवारांना समजावलं जात आहे. तसेच मित्र पक्षांसोबत बसून काही जांगाचा तिढा सोडवला जात आहे. इकडे महायुतीतही काही जागांवर तिढा कायम आहे. खासकरून बारामतीच्या जागेवरून शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आमनेसामने उभे ठाकले आहेत. कोणत्याही परिस्थितीत बारामतीतून लढणारच असा निर्धार शिवतारे यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आज दुसऱ्यांदा भेट घेतल्यानंतरही शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. एवढेच नव्हे तर बारामतीच्या जागेवरून अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ब्लॅकेमल करत असल्याचा गौप्यस्फोटच शिवतारे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे
विजय शिवतारे यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. अजित पवार यांनी माझा आवाकाही काढला होता. तुझी लायकी किती? तू बोलतो किती? तुझा आवाका किती? असं अजितदादा बोलले होते. माझा नाही अवाका तर कशाला धडपड करतो? आमच्या मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेलिंग करतो, इकडे उमेदवार उभे करू, तिकडे उभे करू? असा इशारा देतो. कशाला करतो? लढ ना तुझ्या ताकदीवर, असं आव्हान देतानाच माझा पाठिंबा जनतेला आहे. जनता सांगेल ते करणार. महायुतीचा धर्म निभवायचा की नाही याबाबत मी दोन-चार दिवसात माझी भूमिका व्यक्त करणार आहे, असं विजय शिवतारे म्हणाले.
दोन-तीन दिवसानंतर माझी पुन्हा मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल. लोकांशी चर्चा होईल. त्यानंतर निर्णय होईल. कसली सौम्य भूमिका? अरे माझी किडनी घालवली. माझं हार्ट घालवलं. पालकमंत्री असताना इतका नालायकपणा केला की मरू दे मेला तर, असं बोलले. पालकमंत्री म्हणून ते मला भेटायलाही आले नाही. मी कुणासाठी लढत होतो? गुंदवलीच्या पाण्यासाठी लढत होतो. अख्खा महाराष्ट्राला माहीत आहे. इतका नालायकपणा आणि इतका हेकेखोरपणा त्यांनी केला. त्यात माझी किडनी गेली आणि हार्ट गेलं. तरीही मी त्यांना माफ केलं. पण पुरंदरची जनता त्यांना माफ करणार नाही. बारामतीची जनता त्यांना माफ करणार नाही. हा हेकेखोरपणा आहे, असा हल्लाच शिवतारे यांनी चढवला.
अजित पवार यांना कायम विरोध
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली दीड तास ही बैठक चालली यामध्ये युती धर्माचे पालन करायचा आहे असे मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले. त्यावर मी दोन ते तीन दिवसांमध्ये माझा अभिप्राय कळवणार आहे. अजित पवार हा अत्यंत अहंकारी माणूस आहे. नालायक माणूस आहे. ज्या पद्धतीने मी सुरुवातीला बोललो त्यावर मी आजही ठाम आहे. माझा कायम अजित पवार या व्यक्तीला विरोध असेल, असंही ते म्हणाले.