१ लाखाच्या दारूसह ११ लाखाचा मुद्देमाल जप्त;गडहिंग्लज शहरातील तिघांना अटक

KolhapurLive

आंबोली,ता.१२: चक्क ॲम्बुलन्स मधून दारू वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी गडहिंग्लज येथील तिघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आंबोली चेक पोस्ट येथे करण्यात आली. त्यांच्याकडून नव्या कोऱ्या ॲम्बुलन्ससह १ लाख ८ हजाराची दारू जप्त करण्यात आली आहे. संजय मनोहर कल्याणकर (वय ४०) विनायक शिवाजी पालकर (वय ३८) व भिकाजी शिवाजी तोडकर (वय ४३, सर्व रा. शेंद्री ब्लॉक वाडी ता. गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहे. साई ॲम्बुलन्स सर्व्हिस असे लाल अक्षरात लिहून संबंधित संशयितांनी रुग्णवाहिकेतून दारू वाहतूक केली यात सुमारे १७ बॉक्स दारू आढळून आले आहे. ही कारवाई पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई, आबा पिरणकर, मनीष शिंदे यांच्या पथकाकडून करण्यात आली. दरम्यान संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.