महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडते आहे. याचं कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी ताज लँड्स या हॉटेलवर पोहचले आहेत. राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात रात्री उशिरा एक बैठक झाली. त्यापाठोपाठ आता राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. यामुळे महायुतीत चौथा भिडू येणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच अमित शाह यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे पुत्र अमित ठाकरे होते. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी घेतलेली ही भेट महत्वाची मानली जाते आहे. अशात आता राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहचले आहेत. राज ठाकरेंनी घेतलेली ही भेट सूचक मानली जाते आहे. राज ठाकरे जर महायुतीत आले तर महायुतीची ताकद नक्की वाढणार आहे यात काही शंका नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर महायुतीत सहभागी झाली तर मनसेला दक्षिण मुंबई आणि शिर्डी या ठिकाणी जागा दिली जाईल अशी चर्चा आहे. या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जाते आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात झालेली चर्चाही गुलदस्त्यातच आहे.राज ठाकरे जर महायुतीत आले तर त्यांना लोकसभेच्या जागा दिल्या जातील की विधानसभेसाठी त्यांना जागा सोडल्या जातील हे स्पष्ट झालेलं नाही.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी, भाजपाच्या नेतृत्वात कार्यरत आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे की पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींना बसवण्याला जे समर्थन देतात त्यांचं आम्ही महाराष्ट्रात, महायुतीत स्वागत करु. राज ठाकरेंनी तसा विचार केला असेल तर त्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने ठरवलं आहे की ४५ पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात आणि देशात ४०० पार हे भाजपा आणि रालोआला मिळणार आहेत. राज ठाकरे महायुतीत आले तर त्याचा फायदा आगामी राजकारणात नक्की होईल.”
महाराष्ट्रात जेव्हा शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं त्यानंतर म्हणजेच जून २०२२ नंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदे यांच्यातली जवळीक वाढलेली पाहण्यास मिळाली. या तिघांनी २०२२ ला दिवाळी महोत्सवातही एकत्र उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतरही ते एकमेकांना अनेकदा भेटले. उद्धव ठाकरेंसह असताना आम्ही राज ठाकरेंना भेटू शकत नव्हतो हे तर मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं. या भेटीगाठी वाढल्यापासूनच राज ठाकरे महायुतीत येतील का? या चर्चा रंगल्या होत्या. असं घडलं तर आम्ही त्यांचं स्वागतच करु असं वारंवार भाजपाकडून सांगण्यात आलं आहे. आता महायुतीत चौथा भिडू राज ठाकरेंच्या रुपाने येणार का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.