अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल याने शानदार शतक ठोकलं आहे. शुबमनने चौकार ठोकत आपलं शतक पूर्ण केलं. शुबमन याचं कसोटी कारकीर्दीतील हे दुसरं शतक ठरलं. शुबमन याला हे शतक पूर्ण करायला 194 बॉलचा सामना करावा लागला. यामध्ये शुबमन याने 10 चौकार आणि 1 कडक सिक्स ठोकला.
गिलचं ऑस्ट्रेलिया विरुद्धचं हे पहिलं शतक ठरलं. याआधी गिलची ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकण्याची संधी हुकली होती. गिलने 2020-21 या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात 91 धावा करुन टीम इंडियाच्या विजयात मोठं योगदान दिलं होतं. मात्र शुबमनचं शतक 9 धावांनी हुकलं होतं. पण गिलने आता पुन्हा ती चूक केली नाही. शुबमनने 97 धावांवर असताना चौकार मारत शतंक पूर्ण केलं.
दरम्यान शुबमन याने कॅप्टन रोहित शर्मा याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रोहित 35 धावा करुन आऊट झाला. यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारा याच्यासोबत शुबमनने स्कोअरकार्ड हलता ठेवला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची शतकी भागीदारी केली.