शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांचे स्मारक जाज्वल्य देशभक्तीचे प्रेरणास्थळ ठरेल..-आमदार हसन मुश्रीफ

KolhapurLive
बहिरेवाडी, दि. ४:
भारतमातेच्या संरक्षणासाठी बलिदान दिलेले बहिरेवाडी ता. आजरा गावाचे सुपुत्र शहीद जवान ऋषिकेश रामचंद्र जोंधळे यांचे स्मारक जाज्वल्य देशभक्तीचे प्रेरणास्थळ ठरेल, असे प्रतिपादन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले.
         
बहिरेवाडी ता. आजरा येथे शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांचे स्मारक आणि स्वागत कमान या ८० लाख निधीच्या कामाचा पायाभरणी समारंभ आमदार श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. देशभक्तीपर वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          
यावेळी आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, भारतमातेच्या संरक्षणासाठी सैनिक ऊन, वारा, पाऊस, बर्फ या नैसर्गिक शत्रूंबरोबरच परकीय देशांच्या शत्रूंशी झुंजत असतात. प्रसंगी प्राणांचीही आहुती देत असतात. सैनिकांच्या असीम त्यागामुळेच आम्ही देशवासीय सुखाचे चार घास खाऊ शकतो.
           
"अभिवादन शहिदांच्या पुतळ्याला......!"   
कार्यक्रमानंतर आमदार श्री. मुश्रीफ यांनी शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या घरी भेट दिली. शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या आई-वडिलांनी घरीच प्रतिष्ठापना केलेल्या शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. तसेच, शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या वापरात असलेल्या वस्तूंच्या संग्रहालयालाही त्यांनी आवर्जून भेट दिली.
        
यावेळी सरपंच सौ. रत्नजा सावंत, उपसरपंच दत्ता मिसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे आदींसह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     
बहिरेवाडी ता. आजरा येथील शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या स्मारकाची पायाभरणी आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते झाली.