घरच्या मैदानावर टीम इंडियाच शेर! चौथी कसोटी अनिर्णित; २-१ ने बॉर्डर गावसकर ट्रॉफीवर कोरले नाव

KolhapurLive

भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामना अनिर्णीत राहिला आणि त्याचबरोबर टीम इंडियाने २-१ अशी बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खिशात घातली. मालिकेतील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला होता. सोमवारी (१३ मार्च) दोन्ही संघांतील हा शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राहिला. तत्पूर्वी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाने, तर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. हा सामना जरी अनिर्णीत राहिला तरी देखील भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये स्थान निश्चित केले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० धावा केल्या आणि जवळपास दोन दिवस फलंदाजी केली. यानंतर भारतीय संघानेही जवळपास दोन दिवस फलंदाजी करत ५७१ धावा केल्या. त्यानंतरच हा सामना अनिर्णित राहण्याचा निर्णय घेण्यात आला. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दोन गडी गमावून १७५ धावा केल्या. यानंतर कर्णधार आणि सामनाधिकारी दोघांनीही सामना बरोबरीत सोडवण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत हा सामना नियोजित वेळेच्या जवळपास दीड तास आधी संपला. 

सामन्याच्या शेवटच्या दिवशी पहिल्याच सत्रात रविचंद्रन अश्विन याच्या फिरकी चेंडूवर कुहेनमनने ६ धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट गमावल्यानंतर ख्वाजा दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणे अपेक्षित होते. पण दुसऱ्या क्रमांकावर देखील तो फलंदाजीला आला नाही. मॅथ्यू कुहेनमनने विकेट गमावल्यानंतर संघ व्यवस्थापनाने मार्नस लाबुशेन याला खेळपट्टीवर पाठवले. दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी. पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाने ४८० धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात भारताने ५७१ धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. पहिल्या डावानंतर भारतीय संघाने ९१ धावांची आघाडी मिळवली. एक तास आधीच दोन्ही संघांनी हातमिळवणी करून संयुक्तपणे निर्णय घेत सामना तिथेच थांबवला आणि भारताने मालिका जिंकली.

भारतीय संघाने चौथ्या दिवसाची सुरुवात ३ बाद २५९ पासून पुढे केली. अर्धशतक करून नाबाद असलेल्या विराटने अजिबात जोखीम न घेता एकेरी दुहेरी धावांवर भर दिला. दुसरीकडे जडेजाने २८ धावांवर आपला बळी गमावला. भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर याच्या पाठीचे दुखणे वाढल्याने तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. यष्टीरक्षक भरतने त्यानंतर विराटला साथ देत काही आक्रमक फटके खेळले. मात्र, दुसऱ्या सूत्राचा खेळ सुरू झाल्यानंतर ४४ धावांवर त्याने आपला बळी गमावला होता.

त्यानंतर या मालिकेत शानदार फॉर्ममध्ये असलेल्या अक्षर पटेल याने विराटला साथ दिली. दरम्यान विराटने आपले २८वे कसोटी शतक पूर्ण केले. अक्षरनेही आपला फॉर्म कायम राखताना अर्धशतक झळकावले. दोघांनी सहाव्या गड्यासाठी १६२ धावांची मोठी भागीदारी केली. अक्षरने ७९ धावा काढल्या. त्यानंतर आलेले अश्विन व उमेश हे झटपट बाद झाल्याने विराटवर दबाव वाढला. आपले द्विशतक पूर्ण करण्याच्या प्रयत्नात त्याने १८६ धावांवर आपला बळी गमावला. अय्यर फलंदाजीला न आल्याने भारतीय संघाचा डाव ९ बाद ५७१ वर थांबला. ऑस्ट्रेलियासाठी लायनने सर्वाधिक तीन बळी टिपले.

सामना अनिर्णित राहिल्याने, भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली आणि बॉर्डर-गावसकर ट्रॉफी राखली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या २०२१-२३ चक्रातील ही भारताची शेवटची मालिका होती. या विजयासह टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियन संघ आधीच अंतिम फेरीत पोहोचला होता. आता हे दोन्ही संघ इंग्लंडमध्ये ७ ते ११ जून दरम्यान अंतिम सामना खेळणार आहेत.