हसन मुश्रीफांच्या घरी पुन्हा ईडीचा छापा; दीड महिन्यातील दुसरी कारवाई

KolhapurLive

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आज पुन्हा एकदा ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली. पहाटे ५ ते ६च्या दरम्यान ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या निवास्थानी दाखल झाल्याची माहिती आहे. यापूर्वी ११ जानेवारी रोजी मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील नातेवाईकांच्या निवासस्थानी तसेच गणेशखिंड रस्त्यावरील एका कार्यालयात इडीच्या पथकाने छापा टाकला होता. त्या वेळी ‘ईडी’च्या पथकाने काही कागदपत्रे जप्त केली होती.

कोल्हापुरातील साखर कारखाना खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या व्यवहारात काळा पैसा गुंतविण्यात आल्याचेही ते म्हणाले होते. तसेच मुश्रीफ यांच्या निकटवर्तीयांनी साखर कारखाना खरेदी केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर ईडीकडून मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील मालमत्तांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली होती.

जयंत पाटील यांनीही दिली प्रतिक्रिया

यासंदर्भात जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली. ईडीने अशा प्रकारे पहाटे हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा छापा टाकला आहे, ही बाब धक्कादायक आहे. कितीवेळा छापा टाकली जाणार आहे? मुंबई हायकोर्टाने याच प्रकरणांची सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने मतं व्यक्त केली, की एजेन्सीजचा गैरवापर केला जातो आहे. लोकांच्याही या गोष्टी लक्षात आल्या आहेत ही मतं हायकोर्टाने व्यक्त केल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी अशा प्रकारे धाडसत्र राबवलं जातं हे आश्चर्यकारक आहे. हसन मुश्रीफ यांना त्रास द्यायचा आणि काहीही करून अडचणीत आणायचं हाच अजेंडा यामागे दिसून येतो आहे याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.

दरम्यान, ईडीच्या कारवाईविरोधात मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. “राज्यात विरोधकांना जाणूनबुजून लक्ष्य केलं जात असून भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ही मोहीम हाती घेतली आहे”, असा आरोप त्यांनी या याचिकेद्वारे केला होता. यासंदर्भात शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने किरीट सोमय्या यांच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले होते.