विश्वचषक क्रिकेट: निर्धाव चेंडूंचे प्रमाण कमी करणे गरजेचे! भारतीय फलंदाजांच्या कामगिरीची कर्णधार हरमनप्रीत कौरला चिंता

KolhapurLive

क्वेबेऱ्हा : फलंदाजांना सातत्याने एक-दोन धावा काढून धावफलक हलता न ठेवता येणे हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. आगामी सामन्यांमध्ये फलंदाजीदरम्यान आम्ही निर्धाव चेंडूंचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे, असे मत भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केले.

भारतीय संघाने अखेरच्या साखळी सामन्यात आयर्लंडवर डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार पाच धावांनी मात करत महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. भारतीय संघाला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यात यश आल्याचा आनंद असला, तरी फलंदाजांच्या कामगिरीबाबत पूर्णपणे समाधानी नसल्याचे हरमनप्रीतने स्पष्ट केले. भारतीय फलंदाजांनी इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या गेल्या दोन सामन्यांत अनुक्रमे ५१ आणि ४१ चेंडू निर्धाव खेळले. त्यामुळे भारताची धावसंख्या मर्यादित राहिली.  

‘‘निर्धाव चेंडू हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. पुढील सामन्यात आम्ही यात सुधारणा करून कमीत कमी निर्धाव चेंडू खेळणे गरजेचे आहे. इंग्लंडविरुद्ध आम्ही बरेच चेंडू वाया घालवले. आम्ही धावफलक हलता ठेवण्याबाबत संघाच्या बैठकीत चर्चा केली आहे. मात्र, काही वेळा प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाज टिच्चून मारा करत असल्यास धावा करणे अवघड होते याचीही आम्हाला कल्पना आहे,’’ असे हरमनप्रीतने सांगितले.
आयर्लंडविरुद्ध भारताच्या फलंदाजांना धावांसाठी झगडावे लागले. भारताची १३ षटकांअंती १ बाद ८६ अशी धावसंख्या होती. मात्र, त्यानंतर स्मृती मनधानाने फटकेबाजी केल्यामुळे भारताला २० षटकांत १५५ धावांपर्यंत पोहोचता आले. स्मृती वगळता भारताची एकही फलंदाज २५ धावांचा टप्पा ओलांडू शकली नाही.

‘‘विश्वचषकातील सामन्यांमध्ये दोन्ही संघांवर दडपण असते. प्रथम फलंदाजी करताना तुम्ही १५० धावांची मजल मारल्यास प्रतिस्पर्धी संघ अडचणीत सापडण्याची शक्यता वाढते. आम्ही आमच्या फलंदाजांवर फार दडपण टाकणार नाही. आम्ही खेळपट्टी आणि सामन्याच्या परिस्थितीनुसार फलंदाजी करणे आवश्यक आहे,’’ असेही हरमनप्रीतने नमूद केले.

भारताची युवा सलामीवीर शफाली वर्माने या स्पर्धेत चार सामन्यांत केवळ ९३ धावा केल्या आहेत. मात्र, हरमनप्रीतने शफालीची पाठराखण केली आहे. ‘‘आम्ही शफालीला नैसर्गिक खेळ करण्याची मोकळीक दिली आहे. ती आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची खेळाडू आहे,’’ असे हरमनप्रीत म्हणाली.

विक्रमी १५०वा सामनावीराचा

महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकातील आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीतने अनोखा विक्रम रचला. हरमनप्रीत १५० आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामने खेळणारी पहिली खेळाडू (पुरुष किंवा महिला) ठरली. ‘‘१५० ट्वेन्टी-२० सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी खूप खास गोष्ट आहे. माझ्या संघातील सहकाऱ्यांनी मला छान संदेश दिला. मी ‘बीसीसीआय’ आणि ‘आयसीसी’चेही आभार मानते. त्यांच्यामुळेच आम्हाला इतके सामने खेळण्याची संधी मिळते आहे,’’ असे हरमनप्रीत म्हणाली.