पेरणोली येथील आगीत सव्वा लाखाचे नुकसान

KolhapurLive

आजरा, पेरणोली (ता. आजरा) येथे लागलेल्या आगीत गवत गंज्या व दोन खोपी खाक झाल्या. सुमारे 15 एकरचा परिसर जळून गेला.आठ शेतकऱ्यांचे सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे.

       महसूल विभागाने पंचनामा केला असून, आगीचे नेमके कारण समजलेले नाही.आज दुपारी साडेतीनला ऊन व वाळलेला पालापाचोळा यामुळे आग पसरत गेली. त्यामुळे बाबू लोखंडे, गणपती लोखंडे ,शेवंता लोखंडे, आनंद लोखंडे,हरिबा कांबळे यांच्या गवत गंज्या जळून गेल्या. बाबू लोखंडे यांचे शेळीचे शेड व अनिल कांबळे यांची खोप आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. प्रभाकर देसाई व शेवंता कांबळे यांच्या मेसकाठ्या जळून गेल्या. सुमारे 15 एकरच्या परिसरात आगीचा फटका बसला. आगीचे लोळ दिसू लागल्यावर ग्रामस्थ घटनास्थळी धावले. प्रभाकर देसाई यांच्या घरातून पाणी घेऊन आग विझवण्यात आली. ग्रामस्थांना आग आटोक्यात आणायला सुमारे तासभर अथक प्रयत्न करावे लागले.