चंदगड ते चंदगड फाटा दरम्यानच्या दोन पुलावरील रस्त्याचे काम ठेकेदाराने अर्धवट ठेवले आहे . सतत ये - जा करणाऱ्या वाहनांमुळे परिसरातील नागरीक धुळीने त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रखडलेले पुलांवरील रस्त्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा उपकार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे नागरिकांनी दिला आहे.
चंदगड शहरातील कॉलेज रोडवर नुकत्याच २ पूल बांधकामानंतर ठेकेदाराने कामाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणातील धुळ वातावरणात मिसळत आहे. रस्त्याकडेच्या खाद्यपदार्थविक्रेत्यांची सार्वधिक अडचण झाली असून नागरिकांना धुळीने खोकला, सर्दीच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे.रस्त्यावरील दगड बाहेर आलेले आहेत. सततच्या ये - जा करणाऱ्या वाहनांमुळे ते उडून नागरिकांना व कॉलेज विद्यार्थ्यांना लागत आहेत. काहीजण जखमी देखील झाले आहेत. धुळीचा गांभीर्याने विचार करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा कॉलेज रोड व्यापारी, नागरिक व विद्यार्थ्यांमार्फत रात्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा झीशान मुल्ला शिवाजी कुटे, संदीप अर्धाळकर, समीर नेसरीकर, संतोष पाटील, इजाज दर दरवाजकर यांनी दिला आहे.