पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी पक्षात बंडखोरी झाल्याने त्यामागे कोणीतरी मोठा नेता असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “महाविकास आघाडीला स्वतःचे घर सांभाळता येत नाही आणि ते आमच्यावर आरोप करत आहेत. त्यांनी स्वतःचे घर सांभाळावे उगीच आमच्या डोक्यावर खापर फोडू नये”, असा टोला फडणवीस यांनी अजित पवार यांना लगावला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली. भाजपा उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप या भरगोस मतांनी निवडून येतील, असा विश्वास देखील फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन, अश्विनी लक्ष्मण जगताप, शंकर जगताप, यासह इतर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बुधवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची जयंती होती.
मनसेने दिलेला पाठिंबा हा सशर्त नाही. मनसेने गेल्या काही वर्षांपासून हिंदुत्व स्वीकारले आहे. आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत, म्हणून आम्ही एका विचाराने चालत आहोत. महाविकास आघाडी हे स्वतःचे घर सांभाळू शकत नाही आणि ते आमच्यावर आरोप करत आहेत. त्यांनी स्वतःचे घर सांभाळले पाहिजे. महाविकास आघाडीने दोन-चार उमेदवार जरी उभे केले तरी विजय हा अश्विनी लक्ष्मण जगताप यांचाच होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने त्यांचे घर सांभाळावे. उगीच आमच्या डोक्यावर खापर फोडू नये, असा टोला फडणवीस यांनी अजित पवार यांना लगावला.