खासदार संजय राऊतांनी आपल्या ट्विटर हँडलवरून रीट्वीट केलेला एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाषणातला हा व्हिडीओ असून त्यामध्ये अजित पवार नारायण राणेंवर मिश्किल भाषेत टिप्पणी करताना दिसत आहेत. तर, त्यांच्या टिप्पणीवर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊतांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये अजित पवार नारायण राणेंविषयी खोचक शब्दांत टिप्पणी करताना दिसत आहेत. अजित पवारांनी नारायण राणेंच्या वांद्र्यातील पराभवाचाही संदर्भ देत त्यांचा पराभव एका महिलेने केल्याचं विधान केलं आहे. “नारायण राणेंनी शिवसेना फोडली. सगळे पडले. राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि एकदा मुंबईत पडले. तिथे तर त्यांना महिलेनं पाडलं. बाईनं पाडलं नारायण राणेंना”, असं अजित पवार या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.
यावर नितेश राणेंनी ट्वीटद्वारे प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे की, “अजितदादा मोठे नेते पण वाचल्या शिवाय जमतच नाही बघा. राष्ट्रवादीच्या scriptwriter मित्रांनी जरा योग्य माहिती “लिहून” दिली पाहिजे. राणे साहेबांबरोबर शिवसेनेतून आलेले सगळे आमदार परत निवडून आले. शाम सावंत सोडून. माहिती असुदे दादा..बस या वेळी माझा मित्र पार्थला निवडून आणा.”
याचबरोबर, “गेल्या वेळी बिचारा. एका साध्या शिवसैनिकाने पाडला माझ्या मित्राला. म्हणून ते काही होत का बघा. राणे साहेब देशाचे केंद्रीय मंत्री.. मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले. आपण काय फक्त भावी मुख्यमंत्रीच्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले दिसत आहात. तुमचा आवडता टिललु.” असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर नितेश राणे यांनी ट्वीट करत खोचक शब्दात टीका केली होती. आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे, हे केव्हाच सिद्ध झालं आहे, असं ते म्हणाले होते. याबाबत अजित पवारांनी विचारलं असता, टिल्ल्या लोकांवर बोलायची गरज नाही, त्यांना आमचे प्रवक्ते उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया दिली होती.