मुंबई दौऱ्यावर असताना बँकेत पैसा ठेवून विकास होत नाही, तो पैसा विकासासाठी वापरला पाहिजे, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला होता. यावरून मुंबई महापालिकेचे हजारो कोटींच्या ठेवी या लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांनी घेतलेल्या मेहनतीमुळे ठेवता आल्या आहेत, असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान मोदी यांना दिलं. दरम्यान, यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली, असं ते म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
“उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली. मी शेठजी यासाठी म्हणतो, की त्यांनी धनडांगग्या शेठजींसाठी कामं केली. त्यांनी बिल्डर, ठेकेदार, डिस्को, पब, बार या सर्वांना त्यांनी सुट दिली. मनपाच्या ठेवींबाबत बोलताना तेच म्हणाले की हे ठेकेदारांचे पैसे आहेत. आजही ठेकेदारांचे पैसे परत देण्यासाठी शेठजी उद्धव ठाकरे लक्ष देत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाने टाकलेल्या दरोड्यांपासून मुंबई महापालिका वाचवणं महत्त्वाचं आहे. यासाठी भाजपा मुंबईकरांबरोबर आहे”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली
“उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने केलेला वैचारीक स्वैराचार इतिहासात नोंदवला जाईल, असा आहे. त्यामुळे वैचारीक स्वैराचारचे कृत्य म्हणजे उद्धव ठाकरेंच राजकीय जीवन आहे. मला व्यक्तीगत टीका करायची नव्हती. मात्र, त्यांनी काल आमचे बापजादे काढले, म्हणून आज बोलावं लागतं आहे. उद्धव ठाकरे एक अपयशी नेता आहेत. उद्धव ठाकरेंचे चुलत बंधू त्यांच्यापासून दूर झाले. त्यांच्या पक्षातील नेत्यांनी सुद्धा त्यांना नाकारलं. त्यामुळे कौटुंबिक आणि राजकीय पातळीवर ते अपयशी ठरले आहेत. अशा अपयशी व्यक्तीच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं, याचा विचार करायला हवा. गेल्या २५ वर्षात या दरोडेखोरांनी २२ हजार कोटी खर्च केले, ते काय स्वत:च्या खिशातून खर्च केले का? त्यांनी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर दरोडा टाकला आणि मुंबईकरांना सेवा सुद्धा दिल्या नाहीत ”, असा आरोपही शेलार यांनी केला.