बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज चांगलेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांना चमत्कार सिद्ध करून दाखवण्याचे थेट आव्हान दिले होते. या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनीदेखील बागेश्वर धाममध्ये आपल्या प्रवचनादरम्यान (दरबार) कथित चमत्कार दाखवून मला पुन्हा आव्हान देऊ नका, असे सुनावले होते. धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या कथित चमत्कारावर वाद सुरू असतानाच त्यांनी संत तुकाराम महाराजांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची, असे विधान धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
धीरेंद्र कृष्ण महाराजांचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते संत तुकाराम महाराज यांच्याविषयी बोलताना दिसत आहेत. संत तुकाराम महाराज यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची, असा दावा धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी केला आहे. “संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील एक महात्मा आहेत. त्यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची. याच कारणामुळे त्यांना एका व्यक्तीने विचारले की तुमची पत्नी तुम्हाला रोज मारहाण करते, मग तुम्हाला वाईट वाटत नाही का? या प्रश्नाचे संत तुकाराम महाराजांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, देवाची कृपा आहे की मला मारहाण करणारी पत्नी भेटली. मला प्रेम करणारी पत्नी भेटली असती, तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. मी पत्नीच्याच प्रेमात गुरफटून गेलो असतो. मला मारहाण करणारी बायको मिळाली आहे, त्यामुळे मला प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळते, असे संत तुकाराम महाराज म्हणाले होते.” असे धीरेंद्र कृष्ण महाराज म्हणाले.
दरम्यान, धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. धीरेंद्र महाराजांच्या या विधानावर भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. धीरेंद्र महाराजांनी महाराष्ट्राची माफी मागावी असे तुषार भोसले म्हणाले आहेत. “बागेश्वर धाम तथा धीरेंद्र शास्त्री यांनी तुकाराम महाराजांबद्दल बोलताना एक चुकीचा संदर्भ दिला आहे. त्यातून संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नींच्या प्रतिमेला ठेच पोहोचली आहे. हा फक्त संत तुकाराम महाराज नव्हे तर सबंध महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे आम्ही मागणी करतो की धीरेंद्र शास्त्री यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची तसेच महाराष्ट्राची माफी मागावी,” अशी मागणी तुषार भोसले यांनी केली आहे.