नारायण राणेंच्या आरोपात कितपत तथ्य? संजय शिरसाट म्हणाले, “संजय राऊत अनेकवेळा अरे त्या उद्धवला…”

KolhapurLive

भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. संजय राऊत राज्यसभेत माझ्याशेजारी येऊन मला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल सांगायचे. ते ऐकलं तर उद्धव व रश्मी ठाकरे राऊतांना चपलीने मारतील, असे विधान नारायण राणे यांनी केले आहे. राणेंच्या याच विधानावर आता अनेक चर्चा रंगल्या आहेत. संजय राऊत नारायण राणेंना नेमकं काय सांगायचे, अससे विचारले जात आहे. याबाबत शिंदे गटातील नेते तथा आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. नारायण राणेंच्या बोलण्यात तथ्य आहे, असे शिरसाट म्हणाले आहेत. ते आज (७ जानेवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

नारायण राणे जे बोलले त्यात सत्यता आहे. याबाबत आणखी माहिती हवी असेल तर जे आज मातोश्रीच्या अवतीभोवती फिरत आहेत ते सांगतील. संजय राऊत सार्वजनिक ठिकाणी उद्धव साहेब असे म्हणत असले तरी अनेक ठिकाणी अरे त्या उद्धवला काही कळतं का असे संजय राऊत अनेकवेळा बोललेले आहेत. हे लपून राहिलेले नाही,” असे संजय शिरसाट म्हणाले.

“ही माझी शेवटची निवडणूक आहे. मला एकदा खासदार होऊ द्या. माझा आणि त्यांचा (उद्धव ठाकरे) काहीही संबंध नाही, असे संजय राऊत एकनाथ शिंदे यांना म्हणालेले आहेत. म्हणूनच नारायण राणे यांच्या बोलण्यात तथ्य आहे,” असेही मत संजय शिरसाट यांनी मांडले.

नारायण राणे आणि संजय राऊत यांची मैत्री आहे. त्यामुळे राऊत यांनी नारायण राणे यांना आणखी काही सांगितले असावे. म्हणूनच नारायण राणे तेवढ्या आत्मविश्वासाने बोलत आहेत. संजय राऊत आज जशी बडबड करत आहेत, तशीच बडबड त्यांनी अनेक ठिकाणी केलेली आहे. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील,” असे भाकित संजय शिरसाट यांनी वर्तवले.

माझा आणि रश्मी ठाकरे यांचा जास्त संबंध आलेले नाही. कधीतरी वहिनीसाहेब कशा आहात, इथपर्यंतच आम्ही बोलायचो. नारायण राणे एकदा बोलले तर ते करतीलच. त्यामुळे आगामी काळात काय होणार हे संजय राऊत आणि नारायण राणे यांनाच माहिती आहे,” अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.