गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनी एकाच मंचावर हजेरी लावल्यामुळे युतीसंदर्भातील चर्चांनी आणखी जोर धरला. पण दोन्ही पक्षात युती होणार की नाही? यावर मागील काही काळापासून सस्पेन्स कायम आहे. पण शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी ठाकरे आंबेडकर युतीबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे, असं विधान सुभाष देसाई यांनी केलं आहे. दोन मोठे पक्ष एकत्र येताना बरीच मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. अनेक मुद्द्यांवर चर्चा करावी लागते. ही चर्चा झाली असून आमचं मनातून सगळं ठरलं आहे, असं विधान देसाई यांनी केलं.
सुभाष देसाई यांच्या प्रतिक्रियेनंतर उद्या खरंच शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ठाकरे-आंबेडकर युतीबाबत सूचक विधान केलं होतं. प्रकाश आंबेडकरांनी युतीत येण्याचा निर्णय घेतला तर तो दुग्धशर्करा योग असेल, असं विधान आव्हाडांनी केलं होतं.