चंदगडमध्ये 'बहुजन परिवर्तन' चा पोलिस चौकीवर मोर्चा

KolhapurLive



चंदगड,  ता. २५ : चंदगड तालुका बहुजन परिवर्तन संघटनेतर्फे आज पाटणे फाटा (ता. चंदगड) पोलीस चौकीवर मोर्चा काढला. भाजप व आरएसएसकडून सातत्याने महापुरुषांची बदनामी केली जात असल्याने त्यांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला. पोलिस उपनिरीक्षक सत्पाल कांबळे यांना निवेदन दिले . तत्पूर्वी मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले.
भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. पाटणे फाटा बस स्थानकजवळ आल्यावर मनुस्मृतीचे दहन केले. प्रकाश नाग म्हणाले, 'आजच्या दिवशी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडला मनुस्मृतीचे दहन केले. माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क नाकारणाऱ्या व्यवस्थेला विरोध करून बहुजन समाजाला बंधमुक्त केले. ' संघर्ष प्रज्ञावंत म्हणाले, ' 'महापुरुषांनी स्वतःच्या बहुजन समाजाच्या हितासाठी स्वतःच्या जीवनाची आहुती दिली.  त्यांच्याविषयी भाजप व आरएसएसचे कार्यकर्ते वाट्टेल ते बोलतात ते खपवून घेतले जाणार नाही.' तुकाराम कांबळे, विष्णू कार्वेकर , एकनाथ कांबळे , रामचंद्र कांबळे, कमलेश कांबळे,  सागर कांबळे , नरसिंग कांबळे, श्रीनिवास कांबळे, राकेश कोळी, मिनाक्षी कांबळे,  अनघा प्रधान, नामदेव कांबळे आदी उपस्थित होते. कामत यांनी आभार मानले.  त्यानंतर पाटणे पोलिस चौकीवर जाऊन उपनिरीक्षक सत्पाल कांबळे यांना निवेदन दिले.