आजरा : पेरणोली-देवकांडगाव या मार्गावर एसटीची सेवा अनियमित सुरू असल्याने विद्यार्थी व प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत अनेकदा तोंडी व लेखी मागणी करून एसटी प्रशासनाकडून कार्यवाही होत नाही.सेवा नियमित करावी, याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास एसटी बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा युवा भारत सामाजिक संघटनेतर्फे दिला आहे. याबाबतचे निवेदन प्रभारी आगारप्रमुख पृथ्वीराज चव्हाण यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पेरणोली - देवकांडगाव हरपवडे,कोरीवडे व साळगाव या गावी सोडण्यात येणारी एसटीची सेवा वेळेत व सुरळीत नाही.
विद्यार्थी प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे, याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास एसटी बंद आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे. याबाबत येथील एसटी आगारात आगार प्रमुख श्री चव्हाण यांच्याबरोबर संघटनेच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली.
श्री.चव्हाण म्हणाले की,शासनाने आजरा आगारातील नऊ एसटी गाड्या कमी केल्या आहेत. त्यामुळे ठरलेल्या वेळापत्रकानुसार काम करणे अडचणीचे बनले आहे. येत्या सोमवारपासून पेरणोली साठी सकाळी सात व संध्याकाळी सहा वाजता नवीन बस सुरू केली जाईल.
चर्चेत कृष्णा सावंत, रामचंद्र हळवणकर, मयुरेश देसाई, महेश देसाई,स्वप्निल सावंत, सत्यम गुरव, संकेत दळवी,बजरंग तळेकर, हेमंत चव्हाण, निलेश जोशीलकर, गोविंद गारुडकर, शैलेश जाधव आदी उपस्थित होते.निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष पंकज देसाई, दयानंद सासुलकर, डॉ.भगवान पाटील, बजरंग सुतार आदींच्या सह्या आहेत.