म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात..’ कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या आणि लता मंगेशकरांनी गायलेल्या या गाण्याच्या ओळी छत्रपती महाराजांच्या ज्या सात मावळय़ांसाठी गायल्या गेल्या त्या मावळय़ांपैकी एक म्हणजे प्रतापराव गुजर. अशातच ‘रावरंभा’ हा प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ७ एप्रिल २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटात शिवा ही नकारात्मक भूमिका साकारणारे अभिनेते अशोक समर्थ ‘रावरंभा’ या चित्रपटात सरसेनापती प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारणार आहे.
महाराष्ट्राला लाभलेल्या अफाट इतिहासातील महत्त्वाचे पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांच्या जीवनावर आधारित अनेक ऐतिहासिक पटांची निर्मिती होताना दिसते आहे. महाराजांनी स्वराज्य मिळवण्यासाठी केलेल्या अथक परिश्रमांत त्यांना अनेक मावळय़ांची साथ लाभली. त्यापैकी एक म्हणजे प्रतापराव गुजर. प्रतापराव गुजर यांचे मूळ नाव कुडतोजी गुजर असे होते. प्रतापराव हा किताब छत्रपतींनी त्यांना दिला होता. त्यांच्या पराक्रमाचा इतिहास ‘रावरंभा’ या चित्रपटातून उलगडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक, लेखकांनी केला आहे. दरम्यान, स्वराज्याच्या चौथ्या राजधानीतील म्हणजे शाहूनगरी सातारमधील हा पहिला ऐतिहासिक चित्रपट असून शशिकांत पवार प्रॉडक्शनअंतर्गत या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुप जगदाळे यांनी सांभाळली आहे
काही दिवसांपूर्वीच ‘रावरंभा’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. यावर सरसेनापतींच्या गौरवार्थ ‘निधडय़ा छातीवरती हे, शिवतेज तळपते, गुजर कुळीचे नाव उजळते हे तलवारीचे पाते’ अशी जोशपूर्ण ओळ लिहिली आहे. यामध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर हे चारही बाजूंनी शत्रूने घेरलेलं असताना युद्ध करताना दिसत असून ते शत्रूवर तुटून पडतानाही दिसत आहेत. ‘रावरंभा’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुप जगदाळे यांनी सांभाळली असून शशिकांत पवार यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. लवकरच या चित्रपटात इतर कोणते कलाकार भूमिका साकारणार ते समोर येणार असून पुढच्या वर्षी आणखी एक ऐतिहासिक पट रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.