महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरून सध्या दोन्ही राज्यांमध्ये रान उठलं आहे. राजकीय वर्तुळात या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. महाराष्ट्रात विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपाला घेरायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ते यामध्ये मध्यस्थी करणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावरही आक्रमक भूमिका घेतल्यामुळे हा वाद चिघळला आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
या मुद्द्यावर बोलताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे. “हे एकमेव मुख्यमंत्री आहेत, की त्यांनी आत्तापर्यंत यावर तोंड उघडलेलं नाही. त्यांच्या गटाची निशाणी ढाल-तलवार नसून कुलूप असायला हवी. त्याची चावी दिल्लीकडे आहे. दिल्लीवाले जेव्हा कुलूप उघडतील, तेव्हा हे बोलतील. पण त्यांच्यात बोलण्याची हिंमत नाही. काल सुप्रिया सुळेंनी जोरदार भूमिका मांडली. तेव्हा हे सगळे कुठे होते?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.