नागपूर-मुंबई ‘द्रुतगती समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर १० तासांऐवजी ५ तासांत कापता येईल. समृद्धी महामार्ग उद्घाटनाचे मुहूर्त यापूर्वी अनेकदा ठरले. मात्र, विविध कारणांमुळे उद्घाटन लांबणीवर पडत होते. दरम्यान उद्या (११ डिसेंबर ) या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमासाठी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कसे दिले याबाबत सांगितले.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
“देवेंद्र मुख्यमंत्री होते आणि मी एमएमआरडीसी या खात्याचा मंत्री होतो. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्याला समृद्धी महामार्ग करायाचा आहे. त्यांनी तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवला. त्यावर आम्ही काम करू लागलो. उद्देश एवढाच होता, की १७ ते १८ तासांचे अंतर कमी करायचे. पूर्वीचे रस्ते बघितले. तर कधी पोहोचू त्याच्या विश्वास नव्हता. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग बनवण्याचा निर्णय झाला”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव
“मी मंत्री असताना आम्ही या महामार्गाचे काम सुरू केले होते. आज मी मुख्यमंत्री असताना त्याचे लोकार्पण होते आहे. हा योगायोग आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे, की या महामार्गाला आम्ही बाळासाहेबांचे नाव आम्ही देऊ शकलो. बाळासाहेब हे मोठं उत्तुंग व्यक्तीमत्त्व होतं. त्यांच्या संकल्पनेतून पुणे-मुंबई महामार्ग तयार झाला होता. नितीन गडकरी तेव्हा एमएसआरडीसीचे मंत्री होते. त्यामुळे हा तर ७०० किमीच्या समृद्धी महामार्ग आहे. एवढ्या मोठ्या प्रकल्पाला बाळासाहेबांचे नाव देऊ अशी संकल्पना आम्ही मांडली होती. त्यावेळी सगळ्या गोष्टी त्यावेळी जुळून आल्या आणि आम्ही समृद्धी महारामार्गाला बाळासाहेबांचे नाव दिले”, असेही ते म्हणाले.
“समृद्धी महामार्ग आव्हानात्मक होता”
“एमएसआरडीसीचे खात्याची जबाबदारी आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मला मोठी जबाबदारी देणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर समृद्धी महामार्गाची जबाबदारी माझ्यावर आली. यासाठी लागणाऱ्या अनेक परवानग्या लवकर मिळाल्या. याला काही लोकांचा विरोध होता. हा रस्ता होणारच नाही, असे अनेकांचे म्हणणे होते. जमीन अधिग्रहणदेखील आव्हानात्मक होतं. यावेळी नागरिकांनी विरोध केला. बुलढाण्यात एके ठिकाणी शेतकऱ्याने विरोध केला होता. आधीच्या प्रकल्पाचे पैसे मिळाले नाही, त्यामुळे तो जमीन द्यायला तयार नव्हता. त्यावेळी त्यांना जमीनीचा चांगला मोबदला मिळेल, असे मी सांगितले. तेव्हा मी त्यांच्याखरेदीवर मंत्री असताना पैसे मिळेल असे लिहून दिले होते आणि तिथून चार तासांत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले”, असेही ते म्हणाले.
“समद्धी महामार्ग आव्हानात्मक होता. यादरम्यान जंगल पर्यावरण, प्राणी सर्वांचीच काळजी घ्यायची होती. प्राण्यांसाठी आम्ही ९२ ठिकाणी अंडरपास केले. आठ ओव्हरपास केले आहेत. वन्यजिवांना आपण जंगलाच्या बाहेर आलोय, असं वाटू नये यासाठी आम्ही ३५० कोटी रुपये खर्च करून झाडे लावली आहेत. वन्य जीवांना त्रास न देता, पर्यावरणाचा विचार करून हा महामार्ग बनवण्यात आहे. हे खरोखर आव्हानात्मक काम होते”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.