रावळपिंडी : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना आज पार पडला. आज पहिल्या कसोटी सामन्यातील अखेरचा दिवस पार पडला. पाचव्या दिवशी यजमान पाकिस्तानी संघाने शानदार सुरूवात करून सामन्यात पकड बनवली होती. मात्र अखेरच्या सत्रात इंग्लंडने पुनरागमन केले आणि 74 धावांनी मोठा विजय मिळवला. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लिश संघाने शानदार फलंदाजी करून यजमान संघाला धु धु धुतले होते. इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 101 षटकांत सर्वबाद 657 धावांची विशाल धावसंख्या उभारली होती. यामध्ये इंग्लंडच्या 4 खेळाडूंनी शतकी खेळी नोंदवली. मात्र पाकिस्तानने देखील त्यांच्या डावात शानदार खेळी करून सामन्यात पकड मजबूत केली होती. मात्र अखेरच्या सत्रात इंग्लिश संघाने शानदार पुनरागमन करून कसोटी मालिकेत विजयी सलामी दिली.
पहिल्या डावात इंग्लिश संघाने यजमानांना धुतले दरम्यान, इंग्लिश संघाच्या सलामीवीरांनी आपल्या पहिल्या डावात पहिल्या बळीसाठी तब्बल 233 धावांची भागीदारी नोंदवली होती. जॅक क्राऊलीने 111 चेंडूंमध्ये 21 चौकारांच्या मदतीने 122 धावा केल्या. याशिवाय त्याने इंग्लंडकडून सलामीवीर म्हणून सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम देखील केला. यानंतर डकेटने 110 चेंडूंमध्ये 107 धावा, तर ओली पोपने 104 चेंडूंमध्ये 108 धावा आणि हॅरी ब्रुक्सने 81 चेंडूंचा सामना करत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 101 धावा केल्या. याशिवाय कर्णधार बेन स्टोक्सने 15 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 34 नाबाद धावा केल्या. ब्रुक्सने एका षटकामध्ये 6 चौकारही ठोकले.