AU म्हणजे आदित्य ठाकरे?
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी सरकार आदित्य ठाकरेंना घाबरत असल्याचा खोचक टोला लगावला. “माझ्या बाजूला उभे असलेले आमचे बंधुतुल्य सहकारी आदित्य ठाकरे यांच्यावर एसआयटी बसवायची. दर आठ दिवसांनी त्यांना बोलवायचं. मग तुम्ही जाणार, टीव्हीवर दिसणार. या ३२ वर्षांच्या तरुणाला हे सरकार किती घाबरलंय हे महाराष्ट्र बघणार आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. दरम्यान, आदित्य ठाकरे या गोष्टींना घाबरत नसल्याचं आव्हाड यावेळी म्हणाले. “महाराष्ट्राला याची कल्पना आहे की याच्यात कोणतंही सत्य नाही. सत्य असतं, तर एवढे दिवस याला सोडलाच नसता. पण उगंच बाऊ करायचा आणि सगळे भ्रष्टाचार याच्या AU च्या मागे लपवायचे. हे AU फक्त एनआयटीचा भ्रष्टाचार मागे टाकण्यासाठी काढलं गेलं आहे. यांनाही माहिती आहे की यात काही सत्य नाही. आदित्य ठाकरेंचं कालपासूनचं वागणं बघता ते अजिबात असल्या गोष्टींना घाबरत नाही. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसचा एकही कार्यकर्ता अटकेला घाबरत नाही. ज्यांना अटक करायचीये, करा. पण तुमच्या भ्रष्टाचारावर आम्ही पांघरूण घालू देणार नाही”, असं आव्हाड म्हणाले
रिया चक्रवर्तीचं AU बाबत म्हणणं काय?
“माझ्यावर होत असलेल्या आरोपांपैकी हा एक आरोप आहे. माझी एक मैत्रीण आहे अनाया उदास. तिचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये AU नावाने सेव्ह आहे. पण सगळे म्हणतात त्याचा अर्थ आदित्य उद्धव आहे. यावर खुद्द अनायानं स्पष्टीकरणही दिलं आहे. आम्हीही त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. पण वारंवार हे म्हटलं जातं की ते आदित्य ठाकरे आहे”, असं रिया चक्रवर्तीनं म्हटलं होतं.