चीनमध्ये करोनाचा थैमान! भारतात नव्या व्हेरियंटचे तीन रुग्ण आढळल्याने चिंता; मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

KolhapurLive


चीनसह अन्य देशांत पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्याने भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर, लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी राज्यांना दिला. दरम्यान पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी देशातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

चीनमध्ये मोठी रुग्णवाढ नोंदविणाऱ्या ओमायक्रॉनच्या ‘बीएफ.७’ या उपप्रकाराचे भारतात तीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत गुजरातमध्ये दोन आणि ओदिशामध्ये एका रुग्णाची नोंद झाली आहे. यानंतर ही उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे.

चीनमध्ये करोनाच्या नव्या उत्परिवर्तनामुळे मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी बुधवारी तज्ज्ञांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ‘‘करोनासाथ अद्याप संपलेली नाही. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असली तरी करोना प्रतिबंधक उपाययोजनांवर भर द्यायला हवा. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर करण्याबरोबरच वर्धक मात्रेसह संपूर्ण लसीकरणासाठी प्रयत्नशील राहावे’’, असे मंडाविया यांनी सांगितले.

देशात सध्या करोनाचे ३,४०८ उपचाराधीन रुग्ण आहेत. देशात करोनाची रुग्णसंख्या कमी असली तरी चीनसह अन्य देशांत मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरात करोनाचे सरासरी ५.९ लाख दैनंदिन रुग्ण आढळत आहेत.