भारत आणि चिनी सैनिकांमधील संघर्षानंतर सॅटेलाइट इमेज आली समोर, सीमेवर वसलेलं आहे गाव अन्…

KolhapurLive


अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमाभागात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत अनेक भारतीय जवान जखमी झाले आहेत. ९ डिसेंबरला दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आले होते. २० जवान शहीद झालेल्या अडीच वर्षांपूर्वीच्या गलवान संघर्षांनंतरची ही पहिलीच घटना आहे. यादरम्यान दोन्ही देशांचे सैनिक ज्या ठिकाणी भिडले होते तेथील सॅटेलाइट इमेज समोर आली आहे.

या सॅटेलाइट फोटोमध्ये चीनने तवांगजवळील सीमेवर गावं वसवली असल्याचं दिसत आहे. इतकंच नव्हे तर या ठिकाणी रस्त्याचं बांधकाम सुरु असल्याचंही दिसत आहे.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी’चे सैनिक आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झडल्याच्या वृत्ताला संरक्षण दलातील अधिकाऱ्याने दुजोरा दिला असला तरी त्याबाबतचा तपशील देण्यास मात्र त्याने नकार दिला. चकमकीत भारतीय जवानांपेक्षा चीनचे सैनिकच अधिक जखमी झाले आहेत, असा दावा या अधिकाऱ्याने केला. चकमकीत काही भारतीय जवानांच्या हाता-पायांना गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर गुवाहाटी येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले जाते. भारतीय जवानांची ६०० चिनी सैनिकांशी चकमक झाली, असे सूत्रांनी सांगितले. 

लडाखमधील गलवान खोऱ्यात अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेनंतरची अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद, तर अनेक जखमी झाले होते. अरुणाचल सीमेवर चिनी सैनिकांशी झालेल्या कथित चकमकीच्या घटनेला अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे, मात्र तपशील देण्यास वा त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. या संदर्भात लष्कराला प्रश्नावलीही पाठवण्यात आली होती, मात्र लष्कराकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे वृत्तात म्हटले आहे.

अरुणाचल प्रदेश सीमेवर चिनी सैनिकांशी संघर्ष होण्याची ही पहिलीच वेळ नाही. सीमा निश्चित नसल्याने या भागात गस्त घालताना अनेकदा भारतीय जवान आणि चिनी सैनिक समोरासमोर येतात. अशीच एक घटना २०२१च्या ऑक्टोबरमध्ये घडली होती. चीनच्या मोठय़ा गस्ती पथकातील काही सैनिकांना भारतीय जवानांनी ताब्यात घेतले होते. तेव्हा त्यांच्यात यांगत्सेजवळ किरकोळ चकमक झाली होती.