भारत आणि न्यूझीलंड संघात ३ सामन्यांच्या टी२० मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना मंगळवारी (दि. २२ नोव्हेंबर) नेपियर येथे खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यावर पावसाने रोडा घातला होता. त्यामुळे या सामन्यात नाणेफेकही झाली नव्हती. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ६५ धावांनी विजय मिळवला होता. यासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता भारतीय संघाला ही मालिका जिंकण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागेल.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन तिसऱ्या आणि शेवटच्या टी२० सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी टीम साऊथी न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तसेच, मार्क चॅपमनचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतीय संघाची संपूर्ण जबाबदारी पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव याच्यावर असेल. या सामन्यात भारतीय संघ काही बदल करू शकते. वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर कुलदीप यादवही खेळू शकतो. ‘बर्थ डेबॉय’ उमरान मलिकला आजच्या सामन्यात संधी मिळणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.