उत्तर भारतीयांमध्ये सहानभुती निर्माण करण्यासाठी आदित्य ठाकरेंचा हा दौरा असल्याचं नरेश म्हस्के म्हणाले आहेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे आज एकदिवसीय बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यावरुन शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी टीका केली आहे. “ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला, ज्यांच्या विरोधात बाळासाहेब होते, त्यांना जाऊन आदित्य ठाकरे भेटत आहेत. त्यांच्यावर ही काय वेळ आली आहे… ही केवळ लाचारी आहे”, अशा शब्दात म्हस्केंनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचा समाचार घेतला. उत्तर भारतीयांमध्ये सहानभुती निर्माण करण्यासाठी हा दौरा असल्याचेही म्हस्के यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. या भेटीवर भाष्य करताना “तेजस्वी यादव यांनी महाराष्ट्रात येऊन भेटायला पाहिजे”, असं म्हस्के म्हणाले आहेत. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला जातात, त्यावेळी हे लोक मुख्यमंत्र्यांवर टीका करतात. मात्र, आदित्य ठाकरे तर एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटायला चालले आहेत”, अशी खोचक टीका म्हस्के यांनी केली आहे.
“संजय राऊत बोकडाची औलाद”, आमदार संजय गायकवाडांच्या टीकेला राऊतांचं एका वाक्यात प्रत्युत्तर, म्हणाले…
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेसह महाविकासआघाडीचे कार्यकर्तेही आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. अशातच आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर जात असल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, या भेटीबाबत शिवसेनेकडून एका निवेदनाद्वारे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आदित्य ठाकरेंचा बिहार दौरा सदिच्छा भेटीसाठी असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. या दौऱ्यात आदित्य ठाकरेंसोबत खासदार अनिल देसाई, खासदार प्रियांका चतुर्वेदींसह काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.