मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी त्यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचा शुभारंभ सोहळा नुकताच पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. अक्षय कुमारच्या चित्रपटातील फर्स्ट लूकची झलकही या सोहळ्यात दाखवण्यात आली.
अक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका स्वीकारण्यामागील कारणही सांगितलं. राज ठाकरेंमुळे ही भूमिका स्वीकारल्याचं अक्षय कुमारने सांगितलं. तो म्हणाला, “मला ही भूमिका राज ठाकरेंमुळे मिळाली. तू ही भूमिका करायला हवी, असं मला राज ठाकरे म्हणाले. छत्रपती महाराजांची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या भूमिकेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. सगळी शक्ती मी यासाठी खर्च करेन”.