किटवाड (ता. चंदगड) येथे धरणापासून तयार झालेल्या धबधब्याच्या ठिकाणी खोल खड्ड्यात पडून बेळगाव येथील चार तरुणींचा मृत्यू झाला. तर एका तरुणीला वाचवण्यात किटवाड येथील तीन तरुणांना यश आले. आज शनिवार दि. २६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. बेळगाव येथील चाळीसहून अधिक मुस्लिम पर्यटक सदर ठिकाणी आले होते. सदर पर्यटकांचा बेळगाव येथील नेमका पत्ता अद्याप समजलेला नाही.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी - किटवाड धबधब्याच्या ठिकाणी धबधब्याचे पाणी पडून पुढे जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेल्या सुमारे १२ फूट खोल खड्ड्यात ५ तरुणी पाण्यात उतरण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी गेल्या असता पहिली तरुणी खड्ड्यात पडल्याने दुसरी तिला वाचवण्यासाठी गेली त्यानंतर तिसरी वाचवण्यासाठी गेली, त्यानंतर चौथी असे करत पाच तरुणी त्या खड्ड्यात गेल्या आणि पाचही बुडाल्या. यामध्ये ४ तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर एकीला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. ही बातमी वाऱ्यासारखी किटवाड गावात समजल्यानंतर किटवाड मधील ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. खोल खड्ड्यात उडी मारून तळाला गेलेल्या पाच तरुणींना पाण्याबाहेर काढले. किटवाड येथील महेश हेब्बाळकर, विजय लाड, आकाश पाटील यांनी पाचही तरुणींना बाहेर काढले.
दरम्यान हि माहीती मिळताच त्या मुस्लिम बांधवांचे उचगाव येथील नातेवाईकही घटनास्थळी आले होते. पाण्यात बुडालेल्या तरुणींना तातडीने बेळगाव येथे हलवण्यात आले. बेळगाव येथील अनेक कुटुंबे मिळून असे 50 जण पर्यटक म्हणून येथे आले होते. घटनास्थळी अन्य तरुणी महिलाही उपस्थित होत्या. मात्र या तरुणी बुडाल्याने नंतर पुढे जाण्याचे धाडस कोणी केले नाही. तातडीने किटवाडच्या तीन तरुणांनी धाव घेऊन बुडालेल्या ५ ही तरुणींना पाण्यातून बाहेर काढले या तरुणांच्या धाडसामुळे एका तरुणीचा जीव वाचला पण दुर्दैवाने बाकी ४ जणांचा मृत्य झाला.