गडहिंग्लज : गडहिंग्लजहून दुपारी दोन नंतर बेरडवाडी मार्गे बसर्गेसाठी बस फेऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे. या संदर्भात आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्याच्या पूर्व भागातील बसर्गे, हलकर्णी, बुगडीकट्टी, तेरणी परिसरातील तीनशेवर विद्यार्थी चिंचेवाडी येथील संत गजानन महाराज महाविद्यालयात शिकत आहेत. रोज सकाळच्या सत्रात प्रत्येक गावातून बसची सोय आहे. दुपारनंतर महाविद्यालय सुटते यावेळी गडहिंग्लज येथून येणाऱ्या बसमधून गावी पोहोचणे हाच पर्याय आहे. मात्र गडहिंग्लजमधून निघणाऱ्या सर्व बसेस प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांनी तुडुंब भरलेले असतात.त्यामुळे चिंचेवाडी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना न घेतल्यास या बसेस निघून जातात. यामुळे विद्यार्थ्यांना सायंकाळपर्यंत ताटकळत उभारावे लागते. काही बसेस थांबल्याच तर दाटीवाटीने घुसण्याचा प्रकार घडतो. विशेष करून मुलींना यांचा अधिक त्रास होतो. यासाठी दुपारी दोन नंतर गडहिंग्लज होऊन बसर्गेपर्यंत निघणाऱ्या नियमित फेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी आहे. बाळेश नाईक, संपत्ता घुळानावर,स्नेहा थोरात, सुभाष घेवडे, मारुती नाईक, साईदीप देसाई ,प्रमोद केसरकर आदींचा शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले.