बांगलादेश येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषकात आज भारत विरुद्ध थायलंड यांच्यात उपांत्य फेरीतील पहिला सामना खेळला गेला. आजच्याच दिवशी आशिया चषकाचा दुसरा उपांत्य फेरीतील सामना हा पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाणार आहे. टीम इंडियाने महिला आशिया चषकात लक्षवेधी कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली आहे. जेतेपदाचे एक प्रबळ दावेदार असणाऱ्या भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत थायलंडवर ७४ धावांनी दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
या सामन्यात थायलंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. भारताने शफाली वर्मा आणि हरमनप्रीत कौर यांच्या महत्वपूर्ण खेळीच्या जोरावर २० षटकात ६ गडी गमावत १४८ धावसंख्या उभारली. या सामन्यासाठी हरमनप्रीत कौर कर्णधारपदावर परतली. ती मागील दोन सामने खेळली नव्हती. तिच्याबरोबर रेणुका ठाकुर आणि राधा यादव यांनीही अंतिम अकरामध्ये पुनरागमन केले आहे. त्यामुळे एस मेघना, मेघना सिंग आणि किरण नवगिरे यांना बाकावर बसावे लागले आहे.
थायलंडच्या केवळ दोघी फलंदाजानाच दुहेरी धावसंख्या करता आली, तर दोन फलंदाजाना भोपळाही फोडता आला नाही. मधल्या फळीतील बोचाथ्ममने २९ चेंडूत २१ धावा आणि सलामीवीर-यष्टीरक्षक नन्नापट कोंचाओएनकाय हिने ही २१ धावाच केल्या फक्त चेंडू जास्त खेळले. बोचाथ्ममला स्नेह राणाने बाद केले. मेघना सिंग हीने २ षटके टाकताना ६ धावा देत एक गडी बाद केला. तसेच दीप्तिने ४ षटकात ७ धावा देत ३ बळी घेतले. मागच्या सामनातील मालिकावीर राजेश्वरी गायकवाडने ४ षटकात १० धावा देत २ गडी बाद केले. फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी करणारी शफाली वर्माला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला तिनेही १ गडी बाद केला.