कोल्हापूर जिल्ह्यातील माने घराण्यात सध्या आठव्यांदा खासदारकी आलेली आहे. शिवसेनेकडून विजय मिळवल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार माने हे आता ढाल तलवार या नव्या चिन्हाशी जोडले गेले आहेत. यापूर्वीही त्यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने यांनीही २६ वर्षांपूर्वी पहिली निवडणूक याच चिन्हावर लढवली होती. त्यामुळे शिवसेना, ढाल तलवार व माने घराणे यांच्या नात्यांची नाळ पुन्हा एकदा जोडली गेली आहे.
कोल्हापूर जिल्हा तसा काँग्रेस पक्षाच्या छायेतील भाग. कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ. कोल्हापूर मतदारसंघातून उदयसिंहराव गायकवाड तर तत्कालीन इचलकरंजी मतदारसंघातून बाळासाहेब माने हे सलग पाच वेळा याच पक्षाकडून संसदेत पोहोचले.
हात ते ढाल तलवार
बाळासाहेब माने यांचे निधन झाल्यानंतर १९९६ साली लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. आधी शरद पवार यांनी माने घराण्यात उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बाळासाहेब माने यांच्या स्नुषा श्रीमती निवेदिता माने यांनी निवडणुकीची तयारी केली. मात्र काँग्रेस अंतर्गत राजकारणात शरद पवार यांनी निकटचे संबंध असलेले माजी उद्योग , नगरविकास राज्यमंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे यांना काँग्रेसची उमेदवारी दिली. निवेदिता माने यांनी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून ढाल तलवार हे चिन्ह घेऊन अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. राष्ट्रीय, राज्य, जिल्हा पातळीवर कोणताही प्रमुख नेता सोबत नसतानाही त्यांनी साडेतीन लाखावर मते घेऊन त्यांनी प्रभाव दाखवून दिला. या निवडणुकीत १२ हजाराचे मताधिक्य मिळवून कल्लाप्पाण्णा आवाडे पहिल्यांदा संसदेत पोचले.
नाते शिवसेनेशी
दुसऱ्या निवडणुकीवेळी निवेदिता माने यांनी शिवसेनेकडून धनुष्यबाण चिन्ह घेऊन निवडणूक लढवली. याही निवडणुकीत आवाडे यांची सरशी झाली. तर तिसऱ्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीची स्थापना झाली होती. आवाडे काँग्रेसमध्येच राहून निवडणूक रिंगणात उतरले. माने यांचा हातावर घड्याळ बांधण्याचा निर्णय योग्य ठरला. त्यांनी या निवडणुकीत आवाडे यांच्यावर मात केली. त्या दोनदा राष्ट्रवादी कडून निवडून आल्या. तथापि, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्यांची संसदेत जाण्याची हॅट्रिक रोखली. गेल्यावेळी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी नवख्या धैर्यशील माने यांच्या हाती धनुष्यबाण सोपवले. त्यांनी लाखभर मतांच्या फरकाने शेट्टी यांना पराभूत केले.
पुन्हा ढाल तलवार एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तेचे चित्र पालटले. धैर्यशील माने यांनी शिंदे यांच्यासमवेत राहण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेबांची शिवसेना असे पक्षाचे नाव मिळालेल्या शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह मिळाले असल्याने धैर्यशील माने हे पुन्हा याच चिन्हाशी जोडले गेले आहेत.