Shinde Vs Thackeray: सहा चिन्हांपैकी केवळ ‘मशाल’ पास; पूर्वी ‘या’ पक्षाचं होतं चिन्ह आता मिळालं उद्धव ठाकरेंच्या गटाला

KolhapurLive

केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह मंजूर केलं आहे. मात्र त्याचवेळी बंडखोर गटाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला कोणतेही निवडणूक चिन्ह देण्यात आलेलं नाही. उद्धव ठाकरे गटाने त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल या चिन्हांची यादी निवडणूक आयोगाकडे दिली होती. तर शिंदे गटाकडून गदा, त्रिशूळ आणि उगवता सूर्य अशी तीन चिन्हं सुचवण्यात आली होती. मात्र या सहा चिन्हांपैकी केवळ एका चिन्हाला मान्यता देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने दोन्ही गटाच्या नेत्यांना वेगवेगळी पत्र पाठवून निवडणूक चिन्हं का नाकारण्यात आली आहेत याबद्दलची माहिती दिली आहे. निवडणूक आयोगाने २३ सप्टेंबर २०२१ रोजी जारी केलेल्या यादीमधील उपलब्ध निवडणूक चिन्हांच्या यादीमध्ये दोन्ही गटांकडून सुचवण्यात आलेल्या चिन्हांपैकी अनेक चिन्हांचा समावेश नव्हता, हे सर्वात महत्तवाचं कारण ठरलं.


दोन्ही गाटांकडून पहिली पसंती देण्यात आलेलं त्रिशूळ चिन्ह नाकरण्यामागे या चिन्हाचा थेट धार्मिकबाबींशी संबंध असल्याचं कारण निवडणूक आयोगाने दिलं आहे. हे चिन्हं देणं हा निवडणूक चिन्हांसंदर्भातील नियमांचं उल्लंघन ठरेल, असं आयोगाने म्हटलं आहे. तसेच दोन्ही गटांकडून त्रिशूळ हे चिन्हं पहिली पसंती म्हणून सांगण्यात आल्याने ते कोणालाच न देण्याचा निर्णय घेण्यात आला.