तरुणांची हुल्लडबाजी भोवली? पूल कोसळतानाचं सीसीटीव्ही फूटेज आलं समोर,

KolhapurLive

गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला १०० वर्षे जुना झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १४० जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त होत आहे. दरम्यान पूल कोसळतानाचं सीसीटीव्ही समोर आलं असून यामध्ये काही तरुण पुलावर उड्या मारताना दिसत आहेत. काही तरुणांनी पुलावर केलेल्या हुल्लडबाजीमुळेच दुर्घटना झाल्याचा दावा काही साक्षीदार करत आहेत.

सीसीटीव्हीत पुलावर तरुणांची गर्दी असल्याचं दिसत आहे. यावेळी काही तरुण फोटोशूट करत असताना, त्यांच्या पुढे उभे असणारे तरुण पुलावर उड्या मारताना दिसत आहे. यादरम्यान पूल हालत असल्याचंही व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. यानंतर काही वेळातच पूल कोसळतो आणि सर्वजण खाली नदीत पडतात

अहमदाबादचे रहिवासी विजय गोस्वामी आणि त्यांचे कुटुंबीय या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. गोस्वामी हे कुटुंबियांसोबत रविवारी दुपारच्या सुमारास या पुलावर पर्यटनासाठी गेले होते. यावेळी काही तरुण हा पूल मुद्दाम हलवत असल्याचं त्यांना दिसून आले. पुढचा धोका लक्षात घेता ते या पुलावरुन अर्ध्यातूनच माघारी फिरले. त्यानंतर अवघ्या काही तासातच हा पूल मच्छू नदीत कोसळला.