‘आदिपुरुष’मधील रावणाच्या लूकवरुन होणाऱ्या टीकेला ओम राऊत यांचं चोख उत्तर; म्हणाले “आमचा रावण हा..”
आदिपुरुष दिग्दर्शक ओम राऊत | om raut adipurush director
‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या टीझरवरून सध्या चांगलंच वातावरण तापलं आहे. प्रभासचा श्रीराम यांचा लूक आणि सैफ अली खानच्या रावणाच्या लूकवरुन प्रेक्षकांमध्ये सध्या कामालीची नाराजी पाहायला मिळत आहे. चित्रपटातील व्हीएफएक्सवरुन तर लोकं टीका करतच आहेत. पण रावणाच्या लूकमुळे प्रेक्षक चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. या चित्रपटाच्या ३डी टीझर लॉंच दरम्यान चित्रपटावर होणारी टीका ही वेदना देणारी असल्याचं दिग्दर्शक ओम राऊत यांनी स्पष्ट केलं होतं.
आता ओम राऊत यांनी रावणाच्या या अशा सादरीकरणाबद्दल भाष्य केलं आहे. ‘आज तक’शी संवाद साधताना दिग्दर्शक ओम राऊत यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, “आमच्या चित्रपटातील रावण हा आजच्या काळातील क्रूर रावण आहे. ज्याने आमच्या माता सीतेचे अपहरण केले आहे. आजच्या काळात रावण जितका क्रूर दाखवता येईल तेवढा दाखवायचा आम्ही प्रयत्न केला आहे. हा चित्रपट म्हणजे आमच्यासाठी एक महत्त्वाची मोहीम आहे. जे कुणी या चित्रपटावर भाष्य करत आहेत त्या मंडळींच्या मताचा आम्ही आदर करतो, शिवाय मी त्या सगळ्याची नोंदही घेतली आहे. २०२३ मध्ये जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा नक्कीच तुमची निराशा होणार नाही.”
चित्रपटाचे संवादलेखक मनोज मुंतशीर यांनीदेखील ओम राऊत यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, “लोकांनी चित्रपटाची केवळ १ मिनिट ३५ सेकंदाची झलक पाहिली आहे. लोकं म्हणतात की हा रावण खिलजीसारखा दिसतो. त्यांना मला विचारावंसं वाटतं की, कोणता खिलजी कपाळावर टिळा लावतो, अंगावर रुद्राक्ष आणि जानवं घालतो?”