काम नाही केलं, तर वाडगं घेऊन..”, उदयनराजे भोसलेंनी अधिकारी, लोकप्रतिनिधींना सुनावलं!

KolhapurLive


खासदार उदयनराजे भोसले हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि त्यांच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असतात. कॉलर उडवून बोलण्याची त्यांची स्टाईल राजकीय वर्तुळात कायमच चर्चेचा विषय असते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी साताऱ्यात झालेल्या एका कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा त्यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर स्पष्टीकरण दिलं आहे. शिवाय, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुनावताना ‘वाडगं घेऊन बसण्याची वेळ येईल’, असंही उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.

करेक्ट बोलतो, म्हणून कॉलर उडवतो”

उदयनराजे भोसले यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलसंदर्भात अनेकदा त्यांना विचारणा केली जाते. याबाबत साताऱ्यातील कृषी औद्योगिक वाहन प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमात बोलताना उदयनराजेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. “मी करेक्ट बोलतो, म्हणून कॉलर उडवतो. मी नेहमीच मनापासून बोलतो”, असं म्हणत उदयनराजे भोसलेंनी पुन्हा एकदा कॉलर उडवताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.

यावेळी बोलताना उदयनराजे भोसलेंनी प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना चांगलं काम करण्याचा सल्ला वजा सज्जड दमच भरला आहे! “इथे सोमालियासारखी परिस्थिती निर्माण होऊन या देशाचे तुकडे व्हायला थोडाही काळ लागणार नाही. मग बसाल तसेच. आज आपण खुर्चीत बसतोय. उद्या कुठे बसणार माहितीये का?” असा प्रश्न करून उदयनराजे भोसले चक्क स्टेजवरच मांडी घालून बसले. काली बसून हात पुढे करत ते म्हणाले, “हातात वाडगं घेऊन बसावं लागेल”!