एवढा उजेड आहे, आता मशाल कशाला? लोकांना..,” उद्धव ठाकरे गटाच्या नव्या निवडणूक चिन्हावरून नारायण राणेंचे टीकास्त्र

KolhapurLive


निवडणूक आयोगाने शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाला दोन वेगवेगळी नावे दिली आहेत. या निर्णयानुसार आता शिंदे गट बाळासाहेबांची शिवसेना तर उद्धव ठाकरे गट उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने ओळखला जाणार आहे. उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. याच चिन्हावरून आता भाजपा आणि शिंदे गटातील नेते उद्धव ठाकरे समर्थकांना लक्ष्य करत आहेत. मशाल घेऊन लोकांच्या घराला आता आग लावू नका, असे शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते नारायण राणे यांनीही मशाल या निवडणूक चिन्हावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. मशाल काळोखातून मार्ग काढण्यासाठी असते. आता सगळीकडे उजेड आहे. लोकांपुढे नोकरी, अन्नधान्य, घर असे प्रश्न आहेत. जवळ धनुष्यबाण असताना क्रांती करू शकले नाहीत. आता मशाल घेऊन काय क्रांती करणार? असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

एकनाथ शिंदे यांच्याकडे ४० आमदार आहेत. त्यांच्याकडे (उद्धव ठाकरे) फक्त पाच ते सहा आमदार आहेत. तेही काही दिवसांनी पक्षबदल करतील. त्यामुळे खऱी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. सत्तेत असताना त्यांनी क्रांती घडवली नाही. उलट त्यांनी (उद्धव ठाकरे) लोकांना उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांच्या घराला मशाली लावल्या. त्यांच्या नावात उद्धव आहे. लोकांची घरं उद्ध्वस्त करण्यासाठी मशालीचा उपयोग त्यांनी करू नये, असा खोचक सल्ला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

मशाल काळोखातून रस्ता काढण्यासाठी असते. आता एवढा उजेड आहे. त्यांना दिसत नाही का? लोकांपुढे घर, अन्नधान्य, नोकरी असे प्रश्न आहेत. ते जवळ धनुष्यबाण निवडणूक चिन्ह असताना उजेड पाडू शकले नाहीत. आता मशाल असताना काय उजेड पाडणार? असा खोचक टोलाही नारायण राणे यांनी केला.