राजस्थानात एक भलताच प्रकार उघडकीस आला आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच नववधू नणंदेसोबत पळून गेली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.
राजस्थानः राजस्थान येथील पुष्कर जिल्ह्यात एक आगळी- वेगळी घटना घडली आहे. लग्नानंतर काहीच दिवसांत नववधू अल्पवयीन नणंदेसोबत पळून गेली आहे. लग्नानंतर नववधू नणंदेसोबत पळून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
२७ मे रोजी झारखंडमधील जुम्मा रामगढ येथे राहणारी २५ वर्षीय पूजाने पुष्कर जिल्ह्यातील यतु श्रीवास्तव या तरुणाशी लग्न केलं होतं. यतुचलं लग्न ठरवण्यासाठी कुटुंबीय गेल्या ४ महिन्यांपासून वधू संशोधन करत होते. यावेळी त्यांची ओळख मीडिएटर पंकज कुमार यांच्याशी झाली. श्रीवास्तव कुटुंबीयांनी लग्नाच्या खर्चासाठी पंकज कुमारला ३ लाख ५० हजार देखील दिले होते. त्यानंतर धुमधडाक्यात लग्न झालं.
लग्नानंतर काही दिवसांमध्येच पती यतु कामानिमित्त बाहेरगावी गेला. त्याचदरम्यान १० जूनरोजी नववधू पूजा आपल्या १३ वर्षीय नणंदेसोबत घराबाहेर पडली मात्र ती परत आलीच नाही. इतकंच नव्हे तर, जाताना तिने सासू- सासऱ्यांच्या खोलीला बाहेरुन कडी घातली व पोबारा केला.
सासरे दया प्रकाश यांनी जेव्हा घराची झडती घेतली तेव्हा लग्नात नववधूला दिलेले ५ तोळे सोन्याचे दागिने, मोबाइल आणि कॅमेरा गायब होता. कुटुंबीयांनी आधी सुनेला व मुलीचा जवळपास शोध घेतला. मात्र, दोघीही सापडल्या नाहीत. त्यानंतर सासऱ्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असून दोघींच्या तपासासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेतला जात आहे. त्याचबरोबर अजमेर रेल्वे स्थानकावरही फोटोच्या सहाय्याने चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत केलेल्या चौकशीत त्या दोघी झारखंडला पळून गेल्याचा अंदाज आहे.
पूजाचा पती यतु दिव्यांग आहे. त्यामुळंच श्रीवास्तव कुटुंबीयांनी पंकज कुमार याच्याशी संपर्क केला होता. त्यानंतर पंकजने झारखंड येथे राहणाऱ्या पूजाची वहिनी रक्षा आणि अन्य नातेवाईकांसोबत भेटून लग्न ठरवलं होतं. आमची १३ वर्षांची मुलगी सुखरूप घरी येऊदे, बाकी आम्हाला काही नको, अशी विनंती श्रीवास्तव कुटुंबीयांनी पोलिस व स्थानिक प्रशासनाला केली आहे. दरम्यान, पूजा स्वतःहून पळून गेली आहे की प्रकरण काही वेगळंच आहे याबाबत विविध तर्क लावण्यात येत आहेत.