शिवराज महाविद्यालयात दहा दिवसीय विशेष मल्लखांब व रोप प्रशिक्षणास प्रारंभ

KolhapurLive
गडहिंग्लज : भारतीय पारंपरिक क्रीडा संस्कृतीचा अमूल्य वारसा असलेल्या मल्लखांब या क्रीडा प्रकाराच्या प्रसार व विकासासाठी येथील शिवराज महाविद्यालय व द वर्ल्ड फॉक्स स्कूल ऑफ स्पोर्ट्स अँड फिटनेस मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय विशेष मल्लखांब व रोप प्रशिक्षण शिबिराचा उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. शरीराची ताकद, लवचिकता, संतुलन, एकाग्रता व मानसिक धैर्य विकसित करणारा मल्लखांब हा खेळ आज राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगाने लोकप्रिय होत असून या पारंपरिक क्रीडा प्रकारामधून अनेक खेळाडूंना करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत.

शिबिराचे उदघाटन मल्लखांब फेडरेशन ऑफ इंडियाचे माजी सचिव नारायणराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक अभिषेक रामचंद्र पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रीडा शिक्षक डॉ. राहुल मगदूम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांनी मल्लखांब या खेळाचे महत्त्व स्पष्ट करताना विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी अशा प्रशिक्षण शिबिरांची आवश्यकता अधोरेखित केली. तसेच शिवराज महाविद्यालयाने क्रीडा क्षेत्रात नेहमीच उल्लेखनीय कामगिरी करत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना नारायणराव कुराडे यांनी, “मल्लखांब हा केवळ खेळ नसून भारतीय संस्कृतीची ओळख आहे. या प्रशिक्षण शिबिरात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होणार असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय प्रशिक्षण मिळणार आहे. मल्लखांब व रोप या प्रकारामधून करिअर करू इच्छिणाऱ्या खेळाडूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन केले.

राष्ट्रीय प्रशिक्षक अभिषेक रामचंद्र पाटील यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन करताना मल्लखांबमुळे शरीरातील समन्वय, आत्मविश्वास व शिस्त विकसित होत असल्याचे सांगितले. या दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिरात मल्लखांबच्या विविध प्रकारांचे प्रात्यक्षिक, तांत्रिक प्रशिक्षण, फिटनेस प्रशिक्षण तसेच स्पर्धा तयारीचे विशेष मार्गदर्शन दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या प्रसंगी पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, केतन चिंचले, सागर शिंदे तसेच महाविद्यालयाचा राष्ट्रीय खेळाडू शुभम पुजारी यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि प्रशिक्षण शिबिरातील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. जयवंत पाटील यांनी केले.