मानधनवाढीसाठी गडहिंग्लज तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांचे कामबंद आंदोलन

KolhapurLive
गडहिंग्लज : ३ ऑक्टोबर २०२४ रोजी शासनाने मंजूर केलेल्या मानधन व भत्त्यांची अंमलबजावणी अद्याप न झाल्यामुळे गडहिंग्लज तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांनी १ एप्रिल २०२६ पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सहाय्यक सहभागी झाले असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात गडहिंग्लज तालुका ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने तहसीलदार तसेच गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कामबंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या ग्रामरोजगार सहाय्यकांना अत्यल्प मानधनावर काम करावे लागत आहे. शासनाने मंजूर केलेले दरमहा ८,००० रुपये मानधन व २,००० रुपये डेटा भत्ता, असे एकूण १०,००० रुपयांचे मानधन लागू करण्यात आले असले तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. यामुळे सहाय्यकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

ग्रामरोजगार सहाय्यकांकडून जॉबकार्ड नोंदणी, मस्टर रोल तयार करणे, मजुरांची ऑनलाइन हजेरी नोंदवणे, कामांची नोंद ठेवणे अशा विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या जातात. मात्र, त्यानुसार अपेक्षित मानधन मिळत नसल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

शासनाने लवकरात लवकर मानधनवाढ लागू न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.