गडहिंग्लज :पाल्यांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्वाची आहे. आपण यशाच्या दृष्टीने प्रयत्नशील राहिले पाहिजे. माणसाला शहाणे बनविणे म्हणजे शिक्षण होय. पालकांनी जागृत झाले पाहिजे. आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असते तेच विद्यार्थी जीवनात यशस्वी होतात. असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते मधुकर पाटील यांनी केले. येथील संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित ‘पालक उदबोधन सभे’मध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा किसनराव कुराडे होते. तर शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे, नगरसेविका प्रा.सौ. बिनादेवी कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, पालक प्रतिनिधी नगरसेविका सौ.अनिता खोत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी स्वागत व प्रास्तविक पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी केले.
यावेळी मुलांची जडणघडण करताना पालकांची भूमिका महत्त्वाची आहे या विषयावर मार्गदर्शन करताना मधुकर पाटील पुढे म्हणाले- पालकांनी आपल्या पाल्यांमध्ये संस्काराची पेरणी केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. कॉलेज लाईफ हे नॉलेज लाईफ आहे हे विद्यार्थ्यांनी वेळीच जाणले पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्यांना वेळेचे महत्त्व सांगितले पाहिजे. शिस्त शिकविली पाहिजे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. आज मुलांचे कौंसिलींग करणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्याच्या मनाची व मेंदूची मशागत करणे आवश्यक आहे. आपल्या मुलाचे चिंतन पालकांनी करावे असे स्पष्ट करून पाल्यांशी संवाद साधला पाहिजे. मेंदूचा योग्य वापर करण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी आत्मसात केली पाहिजे. ज्युनिअर कॉलेजचे दोन वर्षे फार महत्त्वाचे आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना समजून घेतले पाहिजे. शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला पाहिजे असेही मधुकर पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी लेखन, वाचन आणि मनन केले पाहिजे. पालकांनी अपेक्षांच्या ओझ्याखाली आपल्या पाल्यांना दडपून ठेऊ नका. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण केली पाहिजे. विद्यार्थ्यांमधील कौशल्य वेळीच ओळखा त्याला सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. पालकांनी विद्यार्थ्याना वळण दिले तर जीवनात यशस्वी होऊ शकतात. करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी कष्ट केले पाहिजे. तारुण्य हे घडण्यासाठी असते. हे युग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आहे. आपले आईं-वडील आणि शिक्षकांच्या प्रयत्नातून घडणाऱ्या विद्यार्थ्यांनी मेरिट सिध्द केले पाहिजे. ज्ञानाची करामत ही आपल्याला स्वाभिमान आणि स्वयंपूर्ण बनविते. मिळणाऱ्या संधीतून आपले ध्येय साध्य करणारे विद्यार्थी जीवनात यशस्वी होतात. विद्यार्थ्यांनी मेरिटचा विचार केला पाहिजे. चांगल्या शिक्षकांचा आदर्श घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारांची पेरणी करणे गरजेचे आहे. नवीन काहीतरी करण्याची उमेद विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. असे श्री पाटील यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये पालकांनी आपल्या पाल्यांबाबत जागृत राहिले पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्यांसाठी गांभीर्याने विचार करण्याची आज गरज आहे. खरेतर पालकांची जबाबदारी मोठी आहे. पालकांनी आपल्या पाल्यांचे भवितव्य घडविण्यासाठी जबाबदारी वेळीच घेतली पाहिजे.विद्यार्थ्यांना परिपूर्ण घडविण्यासाठी शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद साधला पाहिजे. आमचे महाविद्यालय हे बहुजनांना घडविणारे आणि सक्षम करणारे आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. किसनराव कुराडे यांनीही विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजला राज्य शासनाच्या शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत करण्यात आलेल्या मूल्यांकनात सर्वोच्च ‘ए प्लस’ श्रेणी प्राप्त मानांकन देऊन गौरविल्याबद्दल डॉ. अनिलराव कुराडे, प्रा.सौ. बिनादेवी कुराडे व समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे व नूतन नगरसेविका, पालक प्रतिनिधी सौ. अनिता खोत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विनाअनुदानित ज्युनिअर विभाग प्रमुख डॉ. संदीप कुराडे यांच्यासह प्राध्यापक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आशा पाटील, प्रा.प्रियांका जाधव यांनी केले. तर आभार प्रा. जयवंत पाटील यांनी मानले.